BULDANA LIVE EXCLUSIVE: संघर्षवीर विनायक मेटे यांचे बुलडाण्याशी तहहयात राहिले ऋणानुबंध! जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्या नेत्याच्या प्रगतीचा जिल्हा ठरला साक्षिदार;
बुलडाणा ( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शून्यातून विश्व निर्माण करण्याचा ताकद, लाथ मारिन तिथून पाणी काढीन अशी धमक असणारा आणि मराठा आरक्षणाचा आवाज तहहयात बुलंद करणारा नेता व विधानपरिषद मध्ये तळपणारा नेता आणि मुंबईतील नियोजित शिवस्मारकाचे प्रणेते अशी विनायकराव मेटे यांची ओळख. निर्भीड, परखड, रोखठोक व्यक्तिमत्वाच्या या नेत्याचे अपघाती निधनामुळे बुलडाणा जिल्ह्यातही हळहळ व्यक्त झाली, असंख्य चाहत्यांना मानसिक धक्का बसलाय...
मराठवाड्यातील बीड हा जिल्हा ऐतिहासिक खाणाखुणा अंगी बाळगणारा, स्वातंत्र्य चळवळीच्या संघर्षांचा साक्षीदार अन भागीदार ! त्या भूमीतून राज्यात नावारुपाला आलेल्या गोपीनाथ मुंडे सारख्या नेत्याने प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत गल्ली ते 'दिल्ली' अशी मजल मारतानाच बुलडाणा जिल्ह्याशी आमरण ऋणानुबंध जोपासले. याच पंक्तीतील एक मातब्बर नाव असलेले विनायकराव मेटे यांचीही बुलडाण्याशी अशीच नाळ जुळलेली असून त्यांच्या संघर्षमय जीवन आणि प्रगतीचा, मराठा महासंघाचा पदाधिकारी ते राज्यातील मातब्बर नेता अश्या वाटचालीचा जिल्हे बुलडाणा व येथील काही सहकारी, स्नेही साक्षीदार राहिले आहे.
भरुन आलेले मन अन अश्रूंनी चिंब आठवणी!
जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात अग्रभागी झळकणारे नेते, राष्टवादीचे माजी जिल्हाध्यक्ष, बुलडाणा पालिकेचे माजी अध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील या यादीत अग्रणीच नसून दिवंगत मेटे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले एक नाव. या दोघांनी सुरुवातीचा प्रतिकूल काळ, संघर्षं, सुख-दुःख, वेदना आपसात शेअर केलेला असून एकमेकांच्या मदतीने मोठं होण्याचा आनंद देखील अनुभवला. कालच डोळ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे ते इच्छा असूनही अंत्यविधीला जाऊ शकले नाही. मात्र डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा आणि सद्गगदित मनाने स्वर्गीय मेटे व अंभोरे परिवार आणि बुलडाणा जिल्ह्याच्या ऋणानुबंध वर प्रकाश टाकला. माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात अ. भा. मराठा महासंघ ऐन बहरात असताना 1982 मध्ये बुलडाण्यात आलेल्या अण्णासाहेबांनी अंभोरे- पाटील व यानंतर बीड मध्ये झालेल्या कार्यक्रमात विनायक मेटे यांना पदासह आशिर्वाद दिलेत.
अत्यंत कठीण जीबन जगणाऱ्या मेटे यांनी संघासाठी घेतलेल्या मेहनतीवर प्रकाश टाकताना ते कधी गहिवरून आले तर कधी ढसाढसा रडले! मुंबईला आपली दुसरी कर्मभूमी मानणाऱ्या मेटे याना त्या काळात संघटनेच्या कामासाठी , पोस्टर आणण्यासाठी एसटीने बुलडाण्यात यावे लागत. 1983 ते 1995 दरम्यान ते जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाना हजर राहिले. शेगावला पार पडलेला मेळावा रेकॉर्ड ब्रेक ठरला याची आठवण अंभोरे यांनी या चर्चेत करून दिली. जिजाऊंच्या भूमीतूनच मराठा आरक्षणाच्या मागणी व आंदोलनाचा एल्गार व्हायला हवा ही त्यांची तळमळ होती आणि तसे करूनही दाखविले. यामुळे आज सुप्रिम कोर्ट, केंद्रापर्यंत पोहोचलेल्या आणि ' एक मराठा लाख मराठा' ठरलेल्या अभूतपूर्व आंदोलनाचे बीजारोपण बुलडाण्यात झाले असे म्हणता येईल.
ही आयुष्यातील खंत...
आयुष्यात अनेक खस्ता खाणाऱ्या आपल्या दिवंगत मित्राच्या राजकीय उत्कर्षाबद्धल 'टीडी' भरभरून बोलले. 1995 मध्ये मातोश्री वर शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची भेट, त्यानंतरच्या काळात विधानपरिषद वर विनायकराव मेटे यांची लागलेली वर्णी, शिवसंग्राम चा उदय, त्याअगोदर स्थापन केलेली नवं महाराष्ट्र विकास पार्टी, विधानपरिषद मध्ये चमकणारा आपला मित्र- सहकारी, पिकेव्ही च्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत मिळालेले यश, त्यांच्या मदतीमुळे राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी झालेली निवड, अश्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जाता न येणे ही सल नेहमीच बोचत राहील असे त्यांनी समारोपात सांगितले .