BULDANA LIVE EXCLUSIVE: धनुष्याबद्धल कन्फ्युजन; ओबीसी वाऱ्यावर! पावसाच्या अंदाजावर आधारित लढतीचा अंदाज लावणे कठीण! देऊळगावराजात धनुष्यबाण कुणाला मिळणार..?

 
shivshena
 बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'सुप्रिम'  आदेशानंतर सुसाट सुटलेल्या निवडणूक आयोगाने पावसाच्या अंदाजावर आधारित निवडणूक घेण्याचे आव्हान पेलून  देऊळगाव राजा सह राज्यातील ९२ पालिकांच्या निवडणुका जाहीर करीत विरोधक, सत्ताधारी गटासह आम पब्लिकला धक्काच दिलाय! बालाजीनगराची ही लढत अनेक संभ्रमवजा प्रश्न निर्माण करणारी, भविष्यातील काही प्रश्नांची उत्तरे देणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. 

पावसाच्या मागील दहा वर्षाच्या अंदाजावर जिथे कमी पाऊस पडतो तिथे निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याचे पालन करीत आयोगाने अश्या ९२ पालिका व नगर पंचायतचा शोध घेत निवडणूक जाहीर केल्या. यामध्ये देऊळगाव राजाचा समावेश असून १० प्रभागातील २१ जागांसाठी( एक प्रभाग ३ सदस्यीय आहे) आता भर पावसात २८ ऑगस्टला मतदान होणार आहे.

या निवडणूकचा अर्थ नंतर समजणार असला तरी यामध्ये ओबीसी बांधवांचा कोणताही विचार करण्यात आला नसून त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षण वरून महा आघाडीला अडीच वर्षे घेरणाऱ्या भाजपा- शिंदे सेनाचे राज्य आल्यावरही ओबीसींची राजकीय दैना कायम हा लढतीचा अनव्यार्थ आहे. धनुष्य बाणावरून ठाकरे व शिंदे सेनेत घमासान सुरु असताना देऊळगाव राजाच्या निवडणुकीत कुणाच्या हाती धनुष्य येणार हा पेच आहे. सेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली दिशा स्पष्ट केली असली तरी दादाराव खार्डे, गोविंद झोरे आदी सेना पदाधिकारी व सैनिक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे.

खेडेकर यांनी भाजपसोबत पॅनल केले तर सैनिक काय करतात हे महत्वाचे ठरणार आहे. पुढील नेतृत्वाची संधी हेरत काही पदाधिकारी व सैनिकांनी स्वतंत्र वा आघाडी समवेत  युती विरोधात निवडणूक लढविली तर धनुष्य कुणाला द्यायचा हा प्रशासन समोरचा पेच ठरू शकतो. थेट जनतेतून अध्यक्ष निवडीसाठी आग्रही असणाऱ्या भाजपासाठी देखील ही लढत अडचणीची बाब आहे. यामुळे लढत क वर्ग पालिकेची असली तरी त्याची व्याप्ती, भावी संघर्षाच्या दृष्टीने असलेले महत्व मोठे आहे.


भाजप व "खेडेकर सेना" युतीत लढले तर ही जोडी विरोधकासमोर चांगले  आव्हान उभे करणार हे नक्की. यात डॉ.गणेश मांटे यांची भूमिका निर्णायक ठरेल असे चित्र आहे. या आव्हानाचा मुकाबला आ. राजेंद्र शिंगणे कसा करतात , ते स्वतंत्र लढतात की काँग्रेस आणि सेनेच्या मावळ्यांना एकत्र घेऊन लढतात हे पाहणे मजेदार ठरणार आहे.
 
आणि...मागील बलाबल

 मागील लढतीत एकसंघ शिवसेनेने सर्वाधिक ५ जागा जिंकल्या होत्या. त्याखालोखाल राष्टवादी. भाजप व काँग्रेसने प्रत्येकी ४ जागी विजय मिळविला होता. एका जागी अपक्षाने  बाजी मारली होती.  भाजपच्या सुनीता शिंदे या थेट जनतेतून अध्यक्ष झाल्या होत्या.