BULDANA LIVE EXCLUSIVE!मतदान आणि आधार कार्ड करणार लिंक!! १ ऑगस्ट पासून शुभारंभ

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काळात 'सुप्रिम' अडथळ्यामुळे थांबविण्यात आलेली मतदान कार्ड व आधार कार्ड लिंकेज ची मोहिम नव्याने हाती घेण्यात येणार आहे. येत्या १ ऑगस्ट पासून या महत्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई स्थित मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येईल. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे, याद्यामधील नोंदीचे प्रमाणीकरण, एकाच व्यक्तीचे २ मतदारसंघात किंवा एकाच व्यक्तीचे एका मतदारसंघात दोनदा नोंदणी रद्द करणे किंबहुना व्यावहारिक भाषेत सांगायचे झाल्यास बोगस मतदारांची नावे वगळणे हा यामागील उद्धेश आहे.

या मोहिमेसाठी एसडीओ यांना प्राधिकृत करण्यात येणार असून ऑफ व ऑन लाईन या दोन्ही पध्दतीने मतदारांना आपला आधार क्रमांक कळविता येणार आहे. मतदाराना ६-ब हा अर्ज भरून किंवा सुविधा पोर्टल, ऐपच्या माध्यमाने हे करता येईल. तसेच बीएलओ घरोघरी जाऊन आधार क्रमांक संकलित करतील. १ ऑगस्ट रोजी मोहिमेचा औपचारिक शुभारंभ होणार असून  बूथ निहाय पाहिले विशेष शिबीर ४ सप्टेंबर ला पहिले व नंतर वेळोवेळी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.
 
मोहिम कायदेशीर, पण ऐच्छिक!

 दरम्यान या मोहिमेचे वेगळे वैशिट्य म्हणजे ती पूर्णपणे ऐच्छिक आहे. मतदारांनी आधार क्रमांक देणे त्याच्या मनावर आहे. आधार क्रमांक दिला नाही तरी कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात येणार नसल्याचे  आयोगाने स्पष्ट केले आहे.