BREAKING आमदार संजय गायकवाड आणि रायमुलकरांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच! खासदार जाधव मात्र कन्फ्युज..!!

 
raymulkar
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी उध्दव ठाकरेंना  सोशल मिडियावरून शुभेच्छा दिल्यात. मात्र सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट आता चांगल्याच चर्चेच्या विषय ठरत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच पोस्ट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळत माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत खासदार प्रतापराव जाधव यांनीसुद्धा केवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला.

मात्र शिंदेगटात पहिल्या दिवसापासून सामील असलेले बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करून आपण अजूनही उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख मानत असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे शिंदेगट   आपणच खरी शिवसेना असा दावा करीत असताना जिल्ह्यातल्या दोन आमदारांनी उद्धव ठाकरे यांनाच पक्षप्रमुख म्हणून संबोधल्याने वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच खासदार प्रतापराव जाधव हे मात्र उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख मानायला तयार नाहीत का असा सवालही उपस्थित होत आहे.