BREAKING! जिल्हा परिषद निवडणुकांची लगीनघाई!! प्रभाग झाले, १३ जुलैला आरक्षण: १८ जुलैपासून......

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील महा बंडखोरी व  सत्तांतर याची फारशी तमा न बाळगता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांची जय्यत तयारी चालविली हाय! मतदारसंघ फायनल झाल्यावर आता १३ जुलैला आरक्षण निर्धारित करण्यात येणार असून त्यापाठोपाठ मतदार यादी कार्यक्रम जाहीर करून आपण एक पाऊल पुढेच असल्याचे सिद्ध केले आहे.

आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार जाहीर केलेल्या या कार्यवाहीसाठी  ३१ मे २०२२ रोजीची  विधानसभा मतदार यादी गृहीत धरण्यात येणार आहे. राज्यातील २५ जिल्हापरिषद व २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ही यादी वापरण्यात येईल. यामुळे आता तमाम राजकारण्यांना निवडणुकीच्या मुहूर्ताची आतुर प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात लढती रंगतात की नंतर रणसंग्राम रंगतो याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच नव्या शिंदे सरकारची काय भूमिका राहणार हा देखील राजकीय उत्सुकतेचा भाग आहे. 

२२ पर्यंत सादर करता येतील हरकती

दरम्यान विधानसभेच्या मतदार यादिवरून तयार करण्यात येणारी ही मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरिता १८ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर २२ तारखेपर्यंत हरकती सादर करता येणार आहे. जिप निवडणूक विभाग व पंस निर्वाचक गणाच्या छापील याद्या २९ जुलैला अधिप्रमाणित करण्यात आल्यावर ऑगस्टला मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.