BREAKING!जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत म्हणतात ... सध्या बुलडाण्यातच! ' मातोश्री' च्या निरोपाची प्रतीक्षा; वर काहीही होउद्या जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक शिवसेनेसोबतच..!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर संघटना म्हणून शिवसेनेवर काय परिणाम होणार? सामान्य शिवसैनिकांची भूमिका काय?? याबद्धल राज्यासह सेनेचा एक गढ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही प्रचंड उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे हे विधान आले असून ते महत्वपूर्ण ठरणारे आहे...

बुलडाणा लाइव्ह सोबत आज मंगळवारी सकाळी बोलतांना  एकनिष्ठ कडवे सैनिक तथा जिल्हा प्रमुख  जालिंदर बुधवत यांनी शॉर्ट बट स्वीट पद्धतीने आपली प्रतिक्रिया वजा भूमिका मांडली. वरच्या पातळीवर काहीही झाले तरी आपण शिवसेने सोबतच राहणार असे त्यांनी  ठामपणे या चर्चेदरम्यान सांगितले. या घडामोडीचा जिल्ह्यातील शिवसेना संघटना व कडव्या शिवसैनिकावर कोणताही परिणाम होणार नाही,असे त्यांनी निक्षून सांगितले. मुबंई वा मातोश्री वरून सध्या कोणताही निरोप नसून आपण आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत असे त्यांनी  बुलडाणा लाइव्ह सोबतच्या  या संवादादरम्यान स्पष्ट केले. 
  
 सेनेचे बंडखोर आमदार आसाम ची राजधानी गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. दरम्यान सेना नेते खा. संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना  आपण एकनाथ शिंदे यांच्या सोबत दीर्घ चर्चा केल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर बुधवत यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.