BL Special : जिल्हा परिषदेवरही प्रशासक राज! सीईओ राहणार सबकुछ; बीडीओ पंचायत समित्यांचे कारभारी!!

 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगर परिषदांप्रमाणेच आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर देखील लवकरच प्रशासकांचा राज राहणार आहे. जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समित्यांवर बीडीओ यांच्यावर प्रशासक पदाची जबाबदारी असेल.

राज्‍य शासनाने प्रशासक नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांची मुदत लवकरच संपत आहे. मात्र या निवडणुका वेळेत घेणे अशक्य असल्याने या संस्थांवर प्रशासक नेमावे, असे राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला मागील महिन्यातच (४ फेब्रुवारीला) कळविले होते. त्यानुसार आता निवडणुकांची मोठी जबाबदारी असलेल्या ग्राम विकास मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास, बुलडाणा जिल्हा परिषदेची मुदत येत्या २० मार्च रोजी संपत असून, पहिली बैठक २१ मार्च २०१७ रोजी पार पडली होती. यामुळे विद्यमान अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष, सर्व स्वभापती यांची सत्ता (मुदत) संपुष्टात येत आहे. यामुळे २१ मार्चपासून जिल्हा परिषदेची सर्वंकष सूत्रे सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्या हाती राहणार आहे. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांची मुदत १३ मार्चला संपत आहे. यामुळे १४ मार्चपासून  या संस्थांमध्ये सर्वार्थाने बीडीओंची चलती राहणार आहे.

प्रशासक पण किती दिवस...
दरम्यान, खादीच्या पांढऱ्या गणवेशाची मक्तेदारी प्रशासक राजमुळे संपुष्टात येणार आहे. पण ती किती दिवस राहणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार प्रशासक किमान ४ महिने वा निवडणूक होईपर्यंत राज करतील.