बुलडाण्यात भाजपच्या पदवीधर संवाद मेळाव्याला पदवीधर कमी अन् पक्षाचे कार्यकर्तेच जास्त; संवाद मेळाव्यात संवाद झालाच नाही! नेत्यांचीच एकतर्फी भाषणे; भाजपच्या प्रचारात पदवीधर मतदार बेदखल..!

 
tdtd
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "संवाद" हा दोन बाजूंनी होत असतो..मात्र बुलडाण्यात आज झालेल्या भाजपच्या पदवीधर संवाद मेळाव्यात भाजप नेत्यांना संवाद या शब्दाचा अर्थच उमगला नसल्याचे दिसले. नेते आले, भाषण केले अन् निघून गेले असाच हा मेळावा झाला. मेळाव्याचे नाव जरी संवाद मेळावा ठेवले तरी पदवीधर मतदारांशी कुणी संवादच साधला नाही. अर्थात मेळाव्याला उपस्थित ४०० जणांपैकी  ५० टक्क्यांपेक्षा जास्त जणांची नावेच पदवीधरांच्या यादीत नसल्याचेही उपस्थितांशी चर्चा केल्यावर समोर आले. त्यामुळे मेळाव्याला पदवीधर कमी अन् पक्षाचे नेते ,कार्यकर्तेच जास्त अशीच मेळाव्याची एकंदरीत तऱ्हा होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रणजित पाटील यांच्यासह भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बुलडाणा शहरातील गोडे महाविद्यालयात हा मेळावा झाला.

विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. महाविकासआघाडीच्या वतीने कांग्रेसकडून धीरज लिंगाडे तर भाजपच्या तिकिटावर १२ वर्षांपासून आमदारकीचा उपभोग घेणारे रणजित पाटील मैदानात आहेत. १२ वर्षांतील जास्तीत जास्त काळ सत्तेत आणि त्यातही मंत्रीपद असताना पदवीधरांकडे केलेले दुर्लक्ष यंदाच्या निवडणुकीत रणजित पाटलांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तशी चिन्हे दिसताच आता रणजित पाटीलही प्रचारासाठी धावपळ करतांना दिसत आहेत. मात्र असे असले तरी ज्यांची मते मिळवण्यासाठी हा प्रचार आहे ते पदवीधर मतदारच भाजपच्या प्रचारात बेदखल असल्याचे चित्र आहे.

बैठकांना, मेळाव्याला पदवीधर मतदार कमी अन सायबांचे कार्यकर्ते जास्त असेच सगळीकडे चित्र आहे. आज, २२ जानेवारीला झालेल्या बुलडाणा येथील पदवीधरांच्या संवाद मेळाव्यातही वेगळे चित्र नव्हते. मेळाव्याला जवळपास ४०० जणांची उपस्थिती होती. मात्र त्यातील बहुतांश पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्तेच होते. उपस्थितांमध्ये पदवीधर मतदारांची संख्या मात्र कमी  असल्याचे दिसले.