BIRTHDAY SPECIALसोशल मीडियावरही रविकांत तूपकरांचा जलवा; फेसबुकवर लाखो फोलोअर्स..चाहते म्हणतात "भाऊ आता हीच ती वेळ"

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात सुद्धा तूपकरांचे अनेक चाहते आहेत. आता सोशल मीडियावर सुद्धा रविकांत तुपकरांनी १ लाख फोलोअर्स चा आकडा ओलांडला आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही नेत्याला ही किमया जमली नव्हती. ती रविकांत तुपकर यांनी करून दाखवली आहे. आमदार महाले यांच्यानंतर सोशल मीडियावर १ लाख फॉलोअर्स चा टप्पा ओलांडणारे रविकांत तुपकर जिल्ह्यातील केवळ दुसरे नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत एकदाही निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेल्या तुपकर यांनी शेतकऱ्यांचा लढवय्या नेता म्हणून  हि लोकप्रियता मिळविली आहे. आता सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे चाहते भाऊ आता निवडणूक लढाच हा हट्ट धरत आहेत.

 


     बुलडाणा तालुक्यातील सावळा या छोट्याश्या गावातून व सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून तुपकर यांनी घेतलेली भरारी हि कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता अशी ओळख त्यांनी संपूर्ण राज्यभरात मिळवली आहे. सोयाबीन,कापूस ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर यांनी आतापर्यंत अनेक लक्षवेधी आंदोलने केली आहेत. काही महिन्यांपूर्वी बुलडाण्यात तुपकर यांच्या नेतृत्वात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आणि त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तूपकर यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे डोळे लागून होते. जीवाची पर्वा न करता तुपकर यांनी पुकारलेल्या लढ्यासमोर अखेर सरकारला झुकावे लागले होते. लोकप्रतिनिधित्व नसतांना सुद्धा  लोकांना न्याय मिळवून देण्याची तुपकर यांची धडपड तुपकर यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवते. शेती माती आणि संस्कृतीशी कटिबद्ध असलेल्या या नेत्याने आता तरी निवडणूक लढवावीच असा आग्रह आता कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याकडे धरू लागले आहेत..
   
दोनदा संधी हुकली

यापूर्वी दोनदा तुपकर निवडणूक लढतीलच अशी शक्यता निर्माण झाली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचा घटक होती. त्यावेळी चिखली विधानसभेची जागा स्वाभिमानीसाठी सोडण्यात यावी असा आग्रह राजू शेट्टी यांनी धरला होता. तुपकर यांनीसुद्धा निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी केली होती मात्र जागावाटपात जागा भाजपच्या वाट्याला सुटली आणि भाजपचे उमेदवार सुरेशआप्पा खबुतरे यांचा राहुल बोंद्रे यांनी पराभव केला. तीच निवडणूक जर तुपकर यांनी लढवली असती तर त्यांच्यापुढे बोंद्रे यांचा निभाव लागलाच नसता अशी चर्चा आजही होत असते. त्यानंतर महायुती सरकार मध्ये तुपकर यांची वस्त्रोद्योग महामंडळावर वर्णी लागली..

मात्र सत्तेत असताना सुद्धा त्यांनी पदाचा  बडेजाव पणा मिरविला नाही. राजू शेट्टी यांनी महायुती तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी चळवळीशी निष्ठा ठेवणाऱ्या या स्वाभिमानी नेत्याने खुर्चीचा  मोह ने धरता पदाला लाथ मारली. सद्यस्थितीत स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करीत असताना स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भोयर हे सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाहीत..

राजू शेट्टी नी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास भोयर दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे..यावरून इतर  सत्तापिपासू नेत्यांपेक्षा स्वतःचे वेगळेपण तुपकर यांनी अधोरेखित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी स्वाभिमानी ने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा लोकसभेत सतत पराभूत होणाऱ्या राजेंद्र शिंगणे यांच्याऐवजी तुपकर  लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. तुपकर यांचा जनसंपर्क बघता ते खासदार प्रतापराव जाधव यांना वरचढ ठरलेच असते मात्र याहीवेळी त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळालीच नाही..
   
भाऊ आता हीच ती वेळ

एकदाही निवडणूक न लढता सुद्धा राजकारणात,समाजकारणात वेगळी ओळख निर्माण करता येते हे तुपकर यांनी दाखवून दिले आहे..मात्र आता तुपकर यांच्यासारख्या लढवय्या आणि अभ्यासू नेत्याचा आवाज  आता सभागृहात गेला पाहिजे अशी अनेक कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आता तुपकर यांना रोखण्याची क्षमता कुणात असेल असे दिसत नाही. बुलडाणा विधानसभा किंवा बुलडाणा लोकसभेची निवडणूक तुपकर यांनी लढविल्यास ते मोठे आव्हान प्रस्थापितांसमोर उभे करू शकतात. त्यामुळे भाऊ आता "हीच ती वेळ" असे त्यांचे चाहते म्हणत  आहेत आणि निवडणूक लढण्याचा हट्ट धरत आहेत.