BIG BREAKING चिखलीत वातावरण पेटले; खा. प्रतापराव जाधवांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले; प्रत्युतरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सैनिकांनी उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडले!
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख म्हणाले, चिखलीवाल्यांत दम नाही, हा कारनामा बाळापूर वाल्यांचा
Updated: Nov 26, 2022, 21:12 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांनी शिंदे फडणवीस सरकार वर हल्लाबोल केला. दरम्यान सभा संपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर लागलेले खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान काही वेळातच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जशास तसे उत्तर देत उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडले.
खा. प्रतापराव जाधव यांचा काल, २५ नोव्हेंबरला वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चिखली शहरभर बॅनर लावले होते. त्याच बॅनर ला लागून उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेचेही बॅनर लावण्यात आलेले होते. मात्र आज, सभा संपल्यानंतर काहींनी खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडून रस्त्यावर फेकले. त्यामुळे चिखलीत तणाव निर्माण झाला. काही वेळातच खा. प्रतापराव जाधव यांच्या समर्थकांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सभेचे पोस्टर फाडले.
या प्रकारानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांच्याशी बुलडाणा लाइव्ह ने संपर्क साधला असता , खा . प्रतापराव जाधव यांचे पोस्टर बाळापूर वाल्यांनी फाडल्याचे त्यांनी सांगितले. चिखलीवाल्यांत तो दम नाही, आम्ही सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देऊ असे विलास घोलप यांनी म्हटले आहे.