BIG BREAKING राहुल गांधींनी बुलडाणा जिल्हा सोडला! मध्यप्रदेशात दाखल; नाना पटोले,बाळासाहेब थोरातांनी दिला भारत जोडो यात्रेला निरोप; निमखेडी वरून वाहनात बसून मध्यप्रदेशात पोहचले;
जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी या आदिवासीबहुल गावापासून १ किमी अंतरावर भारत जोडो यात्रेच्या मुक्कामाचा कॅम्प होता. तिथून पुढील मार्ग हा सातपुड्याच्या पर्वतरांगातील जंगलातून जाणारा असल्याने निमखेडी ते मध्यप्रदेशातील बोदरेली हा ३० मिनिटांचा प्रवास राहुल गांधींनी वाहनाने केला. मध्यप्रदेशच्या हद्दीत दाखल होताच मध्यप्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले.
असा होता बुलडाणा जिल्ह्यातील प्रवास..!
भारत जोडो यात्रा १८ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यातून बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली. १८ नोव्हेंबरला संध्याकाळी शेगावात अभूतपूर्व विराट सभा पार पडली. त्या दिवशी शेगावातील गजानन दादा पाटील मार्केट यार्ड मध्ये यात्रेचा मुक्काम होता.१९ नोव्हेंबरला यात्रा भेंडवळ येथे मुक्कामी होती. त्या दिवशीची भास्तन येथील कॉर्नर सभा "फटाके" वादामुळे चांगलीच गाजली. २० नोव्हेंबरला जळगाव जामोद आणि निमखेडी वरून मध्यप्रदेशात जाणार होती, मात्र राहुल गांधींना गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी जायचे असल्याने २० नोव्हेंबरला यात्रेचा मुक्काम निमखेडी येथेच ठेवण्यात आला. २१ नोव्हेंबरला सकाळी राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातला रवाना झाले. प्रचार आटोपून राहुल गांधी २१ नोव्हेंबरच्या रात्री छत्रपती संभाजीनगरात मुक्कामासाठी दाखल झाले. दरम्यान काल, २२ नोव्हेंबरला सकाळी राहुल गांधी हेलिकॉप्टरने पुन्हा निमखेडी कॅम्प येथे दाखल झाले. काल यात्रेचा विश्रांतीचा दिवस होता. काल रात्रीचा मुक्काम केल्यानंतर आज, २३ नोव्हेंबरला सकाळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने बुलडाणा जिल्ह्यातून निरोप घेतला.