BIG BREKING अखेर बुलडाणा येथे होणारी आदित्य ठाकरेंची सभा रद्द! आदित्य ठाकरे बुलडाण्यात येणार पण...! शिवसेनेचा पोलीस प्रशासनावर रोष

 
thakre
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो नाही म्हणता म्हणता अखेर बुलडाणा येथे ७ नोव्हेंबरला  होणारी आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली आहे. बुलडाणा शहरातील जयस्थंभ चौकातल्या गांधी भवन प्रांगणात या सभेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आ.संजय गायकवाड यांचे कार्यालय जवळ असल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी स्थळ बदलण्याची सूचना आयोजकांना केली होती. त्यावर शिवसेनेच्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी तर सभा गांधी भवनातच घेऊ असा निर्धार केला होता. मात्र आता शिवसेनेकडून दोन पावले माघार घेण्यात आली आहे.

७ नोव्हेंबरला मेहकर येथील सभा आटोपून आदित्य ठाकरे बुलडाणा येथे येतील. त्यानंतर ते मढ फाट्यावर शेतकऱ्यांची संवाद साधून सिल्लोड कडे रवाना होतील असे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना स्पष्ट झाले. याआधी आ. गायकवाड यांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाच्या कार्यक्रमात राडा केला होता. त्यामुळे आता पुन्हा राडा नको म्हणून आदित्य ठाकरेंच्या गांधी भवनातील सभेची जागा बदलण्याचे सुचवले होते. मात्र झाली तर तिथेच अन्यथा नाही अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली. त्यामुळे नव्या कार्यक्रमानुसार आदित्य ठाकरे आता मढ फाट्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.