BIG BREAKING! खा. जाधवांनी पंढरपुरात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! आता जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष खासदारांच्या भूमिकेकडे..!
पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माऊलीची महापूजा पार पडल्याची दृश्ये पाहणाऱ्या जिल्हातील काही राजकीय वर्तुळाला, खासदार आषाढी निमित्त भूतलावरील वैकुंठ असलेल्या पंढरपूरात दाखल झाल्याची कुणकुण लागली. प्रतापगड मध्ये ही वार्ता वादळाच्या वेगाने पसरली. नावातच 'प्रताप' असलेल्या खासदार जाधवांनी आपल्या ३ दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा राजकीय प्रताप दाखवित अनेकांना धूळ चारली. एकही लढत न हरणाऱ्या या 'मास लीडर' ने विधानसभा निवडणुकीत सुबोध सावजी तर लोकसभेत राजेंद्र शिंगणे सारख्या नेत्यांना आपल्या धनुष्य बाणाने घायाळ केलं.
'पंढरपूर हुन आल्यावर सांगतो काय करायचं!'
या पार्श्वभूमीवर नव्वदीच्या दशकांपासून ते सेना एके सेना या निष्ठेने वाटचाल करीत राहिले. मात्र आता महाबंड, सत्तांतर झाले. खासदारांचे प्रमुख चेले आजी माजी आमदार शिंदे सेनेत दाखल झाले. ते भाऊंच्या ग्रीन सिग्नल शिवाय जाऊच शकत नाही ही जाणकारांची खात्री (आणि राजकीय वास्तव देखील) आहे. यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे हजारो सैनिक, राजकीय समर्थक अन विरोधक सुद्धा डोळे लावून बसले आहेत. ते आज पंढरपूर मध्ये असल्याचे कळताच सर्वांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. याचे कारण मुख्यमंत्रीच नव्हे काही बंडखोर( त्यांच्या भाषेत 'क्रांतिकारक' ) आमदारही महापूजेला आले होते.
त्यामुळे ही धार्मिक की राजकीय वारी, पुढील उठावाची तयारी, खलबते , भेटी गाठी की केवळ योगायोग असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी मग थेट खा. जाधव यांनाच फोन करून, ' पुढे काय भाऊ' ? असे विचारले असता ' पंढरपूर येथून आल्यावर सांगतो काय करायचे', असे भाऊंनी सांगितल्याचीही चर्चा होत आहे. ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्र, बहुमत चाचणी यावर सुनावणी होणार आहे. यामुळे मंत्री मंडळ विस्तार दोनेक आठवड्यापासून रखडला आहे. निकालानंतर यावर निर्णय होईल. त्यामुळे भाऊंनी सांगितलेला मुहूर्त आणि शिंदे गटाचा मुहूर्त सारखा असणे हा बी केवळ योगायोग हाय का? असा सवाल ऐरणीवर आलाय...