अशोक सोनुनेंनी राऊतांच्या व्यक्‍तीगत आयुष्यावर टीका करायची गरज नव्हती!; बुलडाण्यात चळवळीतील नेत्‍यांनी घेतली पत्रपरिषद

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे या नेत्यांनी दलीत समाजासाठी मोठे काम केले आहे. नितीन राऊत यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलण्याची अशोक सोनुने यांना काहीही गरज नव्हती. अशोक सोनुने कधीही दलितांसाठी रस्त्यावर उतरले नाहीत, असे म्हणत जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काँग्रेस नेते दिलीप जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

खामगावात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वंचितने नितीन राऊत यांचा निषेध केला. प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने यांनी राऊत कॅरेक्टरलेस असल्याचे विधान केले होते. तसेच माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी लोकांना पैसे देऊन पक्षात घेतले, असे विधान केले होते. अशोक सोनुने यांच्या या विधानाचा आम्ही समाजाच्या वतीने निषेध करत आहोत, असा दावा पत्रकार परिषदेला उपस्थित नेत्यांनी केला. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप जाधव, भूमी मुक्ती मोर्चाचे प्रदीप अंभोरे, दलीत मुक्ती सेनेचे विजय गवई, भीमशक्तीचे अर्जुन बोर्डे, राजू पैठणे उपस्थित होते.

या प्रश्नावर मात्र गप्प...
मंत्री नितीन राऊत यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याबद्दल केलेल्या विधानाचा तुम्ही समाजाच्या वतीने निषेध करणार नाही का, असे विचारल्यावर ते नितीन राऊत यांचे व्यक्तिगत मत होते. ॲड. आंबेडकर आमच्यासाठी सुद्धा आदरणीय आहेत, अशी सारवासारव नेत्यांनी केली.

आखिर आप कहना क्या चाहते हो...
पत्रकार परिषदेला संबोधित करताना सुरुवातीलाच दिलीप जाधव यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत दलितांसाठी कसे तळमळीने काम करतात हे सांगण्याचा प्रयत्न केला. नितीन राऊत यांच्याबद्दल टीका केली म्हणून त्यांनी अशोक सोनुने यांचा समाजाच्या वतीने निषेध करत असल्याचे सांगितले. त्यानंतर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नितीन राऊत यांनी केलेल्या विधानाबद्दल छेडले असता ही पत्रकार परिषद अशोक सोनुने यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी असल्याचे सांगितले. एकंदरीत पत्रकार परिषद घेतली कोणत्या मुद्द्यासाठी हे शेवटपर्यंत घेणाऱ्यांनाच समजली नसल्याचे दिसून आले.