' त्या ' भामट्या व्यापाऱ्यांना अटक करा अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार! असे 'नटवरलाल' कुठेही आढळले तर कपडे काढून चोप देऊ !! शेतकरी नेते रविकांत तुपकर का संतापले; वाचा....

 
fhfghg
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान कमी असले तरी आज,१६ जूनच्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे तापमान  ५० डिग्रीच्या घरात पोहोचले होते! याचे कारण ठरले स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांचा रुद्रावतार अन सोबत असलेल्या शेदोनशे  शेतकरी व कार्यकर्त्यांचा संताप !! ऑन स्पॉट तातडीच्या कारवाईचे ठोस आश्वासन  मिळाल्यावरच या विरांचा  पारा कमी झाला...

एरवी अधिकारी अन प्रशासना सोबत अगदी शांतपणे चर्चा करून आपल्या मागण्या मांडणाऱ्या रविकांत तुपकरांच्या या संतापाचे कारणही तसेच होते. जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकविलेल्या सोयाबीन ची खरेदी करून त्यांना तब्बल ५० कोटींनी गंडा घालणारे ठकबाज वहिबखान दिलावर खान व संतोष रनमोडे हे फरार झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याने प्रचंड धक्का बसलेले अन कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांनी चिखली व अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या. मात्र ना गुन्हा दाखल ना कारवाई ना अटक अशी स्थिती झाल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे तारणहार अन संकटमोचन असलेल्या तुपकरांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. 

रविकांत तुपकर जिल्हा कचेरीवर धडकले

 प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतकरी नेत्याने हातची कामे सोडून व  शेतकऱ्यांसह जिल्हा कचेरी गाठली!  जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांची भेट घेऊन त्यांच्या समक्ष हा खरेदी घोटाळा मांडला अन कारवाईची मागणी करीत कडक आंदोलनाचा इशाराही देऊन टाकला! यावर श्री रामामुर्ती यांनी लगेच  पोलीस अधीक्षक चावरिया यांच्याशी संपर्क करीत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. याप्रकरणी  स्वतः  वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. 
 
त्यांना कपडे काढून रस्त्यावरच ठोका!

 दरम्यान यानंतर  प्रसिद्धी माध्यमांशी बोलतानाही तुपकरांच्या संतापाचा पारा कमी झालाच नसल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना गंडवणाऱ्या ठकबाजाना मिळाले तिथे कपडे काढून चोप द्या असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी आणि त्यांची संपत्ती जप्त करून फसवणूक झालेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे देणे चुकविण्यात यावे  अशी रोख-'ठोक' मागणी त्यांनी केली. यात किंचितही कारवाई झाल्यास स्वाभिमानी राज्यभरात रस्त्यावर उतरून रान उठवेल असा जहाल इशारा तुपकरांनी दिला. या संतापातही शेतकऱ्यांना सावध करण्याचे भान त्यांनी ठेवले. यापुढे शेतकऱ्यांनी कुणाही व्यापाऱ्याला बोलीवर  आपला माल विकू नये अशी विनवणी करून एका हातात मोबदला मिळल्यावरच दुसऱ्या हाताने माल द्यावा असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.