अन् चंद्रशेखर बावणकुळेंनी सुनावताच रणजित पाटलांचा चेहराच उतरला.! बुलडाण्यात नेमक काय घडल? वाचा...

 
yyjg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले असून आता प्रचारानेही वेग घेतला आहे. १२ वर्षे पदवीधर मतदारांच्या मतांवर आमदारकी उपभोगलेल्या रणजित पाटलांच्या विरोधात महाविकास आघडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर  मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील धीरज लिंगाडे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आधी १२ वर्षे निश्चिंत असलेले रणजित पाटीलही आता प्रचारासाठी धावपळ करतांना दिसत आहे. आज,२२ जानेवारीला रणजित पाटलांच्या प्रचारार्थ बुलडाणा येथे पदवीधरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान रणजित पाटील त्यांचे भाषण आटोपून खुर्चीवर बसताच जवळच बसलेल्या प्रदेशाध्यक्ष बावणकुळेंनी रणजित पाटलांना त्यांच्या भाषणातील एका मुद्यावरून झापले. पेन्शनचा विषय इथे कशाला काढता असे म्हणत बावणकुळेंनी नाराजी दर्शवली. यावेळी रणजित पाटलांचा चेहरा चांगलाच उतरल्याचे दिसले.

भाजप व मित्रपक्षांच्या वतीने श्री.  गोडे कॉलेजच्या आवारात आज पदवीधरांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. भाषण करतांना रणजित पाटील यांनी त्यांच्या १२ वर्षांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला. आपण नगरविकास खात्याचे मंत्री असताना बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांना मोठा निधी दिला. आपल्या कार्यकाळात जेवढा निधी मिळाला तेवढा आधीच्या १५ वर्षात मिळाला नसल्याचा दावा रणजित पाटलांनी केला. भाषणाच्या ओघात रणजित पाटलांनी जुन्या पेन्शन योजनेच्या विषयाला देखील हात घातला. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे रणजित पाटील म्हणाले. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी येणाऱ्या काळात आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचेही रणजित पाटील म्हणाले.
     
 हा विषय काढायची काय गरज..?
 
रणजित पाटील भाषण आटोपून खुर्चीवर बसल्यावर बावनकुळे यांनी रणजित पाटलांना चांगलेच सुनावले. जुन्या पेन्शनचा विषय कशाला काढला, इथे विषय काढायची काय गरज असे बावनकुळे रणजित पाटलांना म्हणाले. त्यावर "लोक विचारतात" म्हणून एवढेच उत्तर रणजित पाटलांनी दिले. यावेळी रणजित पाटलांचा चेहरा मात्र चांगलाच उतरला होता. मेळाव्याच्या समारोपीय भाषणातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या विषयाला बगल दिल्याचे दिसून आले.