राजपूत - मराठा समाज वेगळे दाखविण्याचा चिखलीच्या एका राजकीय कुटुंबाचा प्रयत्न! "भाऊच्या" चिथावणीवरून आपसात नका करू वाद!

बहुजन समाजात भांडणे लावणाऱ्यांपासून व्हा सावध!; चिखलीच्या "त्या" प्रकरणावरून कुणी केले हे आवाहन वाचा..
 
buldanalive
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याची राजकीय अन् राजकीय संघर्षाची सुद्धा राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीचे राजकारण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापलेले आहे. अर्थात चिखलीचे राजकारण पावसाळ्याच्या चिखलात अन् गुलाबी थंडीतही तापलेलेच असते म्हणा..काही दिवसांपूर्वी एका भूमिपूजन कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी नगरसेविका संगीताताई गाडेकर यांनी गोंधळ घातल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते विजय वाळेकर यांनी केलाहोता. त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांत चांगलेच युद्ध रंगले होते. आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही या वादावर पडदा टाकण्याऐवजी काँग्रेसकडून प्रेस नोट काढण्यात येत होत्या..दरम्यान हा सगळा प्रकार म्हणजे बहुजन समाजात भांडणे लावण्याचा प्रकार आहे. बहुजन समाजातील नेतृत्व एकमेकांसमोर उभे करून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार आहे. त्यामुळे कुण्या "भाऊंच्या" चिथावण्यावरून आपसात वाद करू नका आणि बहुजन समाजात भांडणे लावणाऱ्यांपासून सावध रहा असे आवाहन बाळासाहेब खेडेकर यांनी बहुजन समाजाला एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बहुजन समाजातीलच संगीताताई पांढरे यांच्या नावाने प्रेस नोट काढून बहुजन समाजातील श्र्वेताताई विरुद्ध आरोप करायचे तर कधी बहुजन समाजातील संगीताताई पाटील यांना खोटेनाटे सांगून बहुजन समाजातील महिलेविरुद्ध  भडकवायचे असे प्रकार सराईत गुन्हेगाराप्रमाणे करण्यात येत असल्याचा आरोपही बाळासाहेब खेडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.  संगीता गाडेकर आणि विजय वाळेकर यांच्यातील वाद कसे वाढत राहील यासाठी काही जण जाणूनबुजन प्रयत्न करीत असल्याचा आरोप बाळासाहेब खेडेकर यांनी केला.

एकमेकांच्या अंगावर केसेस दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या चकरा कुटुंबियांनाच माराव्या लागतील हे लक्षात घ्या. त्यामुळे कुणाच्या चिथावणीला बळी न पडता लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवा असेही बाळासाहेब खेडेकर यांनी म्हटले आहे. राजपूत आणि मराठा समाजात वाद लावण्याचे प्रयत्न काहीजण करीत आहेत. १९७०- १९८० च्या दशकापर्यंत राजपूत मराठा असा भेद चिखली तालुक्यात कधीच नव्हता . सर्व मराठ्यांचे मूळ शोधले तर सर्वच मराठे हे क्षत्रिय राजपूत आहेत.

मेऱ्याच्या पडघान परिवारातील अनेक मुली राजपूत कुटुंबात त्या काळात देण्यात आल्या. रोटी बेटी व्यवहारचे हे प्रमाण वाढत जाणे गरजेचे असतांना  चिखलीतील  एका कुटुंबाने जाणीवपूर्वक राजपूत आणि मराठा कसे वेगळे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बाळासाहेब खेडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे समजाच्या प्रगतीसाठी आणि एकजुटीसाठी रोटी - बेटी व्यवहार गरजेचे असल्याचे बाळासाहेब खेडेकर यांनी म्हटले आहे. निवडणुका दोन दिवस चालतील. त्यानंतर रोज एकमेकांचा चेहरा बघणेच आहे. त्यामुळे कुण्या "भाऊंच्या" नादाला लागून वाद वाढविण्यापेक्षा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा , एकमेकांना मदत करा असा सल्लाही बाळासाहेब खेडेकर यांनी बहुजन समाजाला दिला आहे.