सार काही हिंदुत्वासाठी! गरज पडल्यास खासदार प्रतापराव जाधव भाजपमध्येही जातील?
आपल्या तीन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत खा. जाधव यांनी स्वतःची विकासपुरुष , भूमिपुत्र अशी प्रतिमा निर्माण केली आहे. आमदार असताना मेहकर विधानसभा आणि खासदार असताना बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा त्यांनी प्रचंड भरभरून विकास केला. मेहकर, लोणार तालुक्यात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला खा. जाधव यांनी केलेल्या विकासकामांचा अनुभव येतो. त्यांनी केलेल्या विकासकामाचा परिणाम प्रत्येक निवडणुकीत दिसतोच.
मोदी लाटेमुळे खा. जाधव दोनदा निवडून आले असा आरोप त्यांचे विरोधक करीत असले तरी त्यात तथ्य दिसत नाही. स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची ताकद त्यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघात निर्माण केल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत असतात. विशेष म्हणजे सत्ता नसली तरी चालेल पण हिंदुत्व टिकले पाहिजे यासाठी खा. जाधव लढत असतात. खा. जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळावे अशी त्यांच्या समर्थकांची अन समस्त बुलडाणेकरांची इच्छा असली तरी मंत्रीपदापेक्षा हिंदुत्व महत्वाचे ही खा. जाधवांची भूमिका आहे.
त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही तरी ते नाराज होणार नाहीत कारण मुद्दा हिंदुत्वाचा आहे. कारण केवळ हिंदुत्वासाठी ते शिंदेगटात गेले. न्यायालयाचा निर्णय विरोधात आला तर हिंदुत्वासाठी ते भाजपमध्येही जातील असेही आता बोलल्या जात आहे. अर्थात खा. जाधव हा सारा खटाटोप खासदारकीसाठी नव्हे तर केवळ हिंदुत्वासाठी करण्याची शक्यता आहे हे विशेष .