संग्रामपूर, मोताळ्यात राजकीय हालचालींना वेग! जनादेशाप्रमाणे सत्ता की राजकीय चमत्कार? अध्यक्षपदाची 14 फेब्रुवारीला निवडणूक; उद्यापासून नामांकन
दोन टप्प्यांत पार पडलेल्या या 17 सदस्यीय संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष व संग्रामपूर मित्र परिवार युतीने तर मोताळ्यात काँग्रेसने प्रत्येकी 12 जागा पटकावत स्पष्ट बहुमत मिळविले. यामुळे प्रहार व काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात काही मोठा राजकीय चमत्कार वा दगाफटका झाला नाही तर सत्तेसाठी त्यांना फारसे परिश्रम घ्यायचे काम नाही. मोताळ्यात काँग्रेसकडे 5 सदस्य तर संग्रामपुरात महाविकास आघाडीकडे देखील पाचच सदस्य आहे. एवढ्या विषम स्थितीत मोठी "पंचायत' करणे अशक्यप्राय असले तरी विजेत्या गटात थोडी फार तरी धाकधूक आहेच, असे चित्र आहे.
नामांकनासाठी तीनच तास...
दरम्यान, संग्रामपूरमध्ये अध्यक्ष पदासाठी एकच पर्याय असल्याने स्पर्धा हा शब्दच नाही. मात्र मोताळ्यात चारेकजण स्पर्धेत आहे. यामुळे अध्यक्ष पदाचा कालावधी सव्वा वर्षाचा करून चौघांना संधी देण्याचा निर्णय नेते घेऊ शकतात. किंबहुना तसा निर्णय झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, नामांकनासाठी उद्या 8 फेब्रुवारीला सकाळी 11 ते दुपारी 2 इतकाच मर्यादित कालावधी आहे. यामुळे मोताळ्यात अध्यक्षीय उमेदवारांच्या नावावर आज रात्री उशिरापर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र सर्वाधिक संधी माधुरीताई देशमुख यांनाच आहे. संग्रामपुरात पर्याय नसल्याने प्रहारच्या उषाताई सोनोने यांचाच अर्ज राहणार हे उघड आहे.
11 तारखेपर्यंत घेता येणार माघार
दरम्यान, पंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या अर्जांची उद्याच दुपारी 2 वाजेनंतर छाननी करण्यात येणार आहे. 8 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 ते 10 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेदरम्यान अर्ज फेटाळलेल्यांना अपील करता येईल. 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजेपर्यंत इच्छुकांना माघार घेता येईल. 14 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता तहसीलमध्ये सभेला सुरुवात होऊन अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल.