मेहकरात पुन्हा घोंगवतेय रहाटे नावाचे वादळ! नव्याने उभी राहतेय आक्रमक शिवसेना!! ' संवाद यात्रा ' ला उत्साही प्रतिसाद

 
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) काळ (आणि राजकारण)  परिवर्तनशील राहतो, पृथ्वी गोल आहे, याचा प्रत्यय मेहकर विधानसभा मतदारसंघात नव्याने येतोय! चारेक दशकांपूर्वी तिथे घोंगवणारे रहाटे नावाचे आणि आक्रमक सैनिकांचे भगवे वादळ पुन्हा निर्माण होत आहे.  महाबंड नंतर रहाटे या जादुई नावावर व  नेतृत्वातच  शिवसेनेची नव्याने पण वेगाने बांधणी, उभारणी होत आहे...

इतिहासाची ही मजेदार आणि भविष्यातील राजकारण बदलण्याची पुनरावृत्ती होतेय 'शिवसेना भवन' कडून  कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवणाऱ्या  माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे या युवा नेत्याच्या नेतृत्वात! प्रतापगड शिंदेशाही च्या ताब्यात गेल्यावर तो पुन्हा काबीज करण्यासाठी व त्यावर बाळासाहेबांचा आणि स्व दिलीपरावांचा भगवा फडकविण्यासाठी त्यांनी अंजनी बु.  गटातच नव्हे तर मेहकर विधानसभा मतदारसंघात संपर्क अभियान सुरू केलंय! कोणतंही नियोजन नाही अन गर्दी जमवायचा कार्यक्रम नाही. खासदार आणि पाठोपाठ उरलेसुरले सरदार गेल्याने निराधार व संभ्रमित झालेल्या नवीन व जुन्या सैनिकांशी त्यांनी संपर्क साधून संवाद करणे, त्यांना दिलासावजा पाठबळ देण्याची मोहीम उघडली आहे.

मै तो अकेला चला था जाणिबे मंजिल मगर, लोग आते गये, कारवा बनता गया...

या धर्तीवर सुरू झालेले हे प्रयत्न प्रचंड प्रतिसादमुळे मोहीम झाली, संपर्क अभियान आणि मग संवाद यात्रा ठरली! ज्या गावातून आवतन आलं तिथे जायचं , संवाद साधायचा, कॉर्नर बैठक घ्यायची, सैनिक व सर्व सामान्यांना उद्धव ठाकरे व अस्सल शिवसेनेसोबतच राहण्याचे सांगायचे, आपल्या वडिलांच्या त्यागाचा धगधगता इतिहास सांगायचं ही त्यांची स्टाईल! याला अनपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे या प्रयत्नांनी  सध्या शायर मिर्झा गालिबाच्या वरील शेर चे रूप धारण केलंय ! काल उकळी सुकळी येथे याचा जबरदस्त प्रत्यय आला.  भेटी गाठी पुरता असलेला हा दौरा जंगी कार्यक्रम आणि सेनेतील जुना आक्रमक जोश दाखविणारा ठरला. बस थांबा ते बैठकीच्या सभेपर्यंतची पदयात्रा अभूतपूर्व म्हणावी अशीच व्हती. त्यानंतर झालेली सभा देखील जंगी ठरली. 

...आणि आक्रमक भाषण

यापूर्वी घाटबोरी, लोणी लव्हाळा, गजरखेड, कल्याणा, उसरण, वडगाव माळी, शेंदला येथील कार्यक्रमाने देखील भगवे वादळ निर्माण झाले.  घाटबोरी येथे  हभप विठ्ठल महाराज नवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील ज्युनिअर रहाटे यांचे भाषण चांगलंच गाजले. बंडखोरीनंतर पाला पाचोळा उडून गेला, पण सेनेचे झाड मजबूत आहे, आता त्यावर नव्याने पालवी फुटून ते पुन्हा गदबदणार असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. पस्तीस वर्षे सर्व पदे मिळालेल्याना उद्धव ठाकरे कधीच भेटले नाही का? आत्ताचे बंड कश्यासाठी, कोणाच्या इशाऱ्यावर हे जनतेला चांगलंच ठाऊक हाय. त्यामुळे स्व. दिलीपराव रहाटे आणि उद्धव ठाकरे यांच्या अस्सल सेनेचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी केले. या संवाद यासुरूच राहणार असे बुलडाणा लाइव्ह सोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले...