मेहकरात उसळला भगवा जनसागर! पालकमंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी! म्हणाले बुलडाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहणार!

 खासदार जाधवांनी आदित्य ठाकरेंना घेतले फैलावर, दिले "हे" चॅलेंज! १०० खोके मातोश्री ओके चा दिला नारा..!
 
 

मेहकर(कृष्णा सपकाळ, अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहणार असे ठणकावून सांगत पालकमंत्री म्हणून बुलडाणा जिल्ह्याला आणि शिवसेनेला काहीही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मेहकर येथील कृषी वैभव लॉन मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित हिंदुगर्वगर्जना यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड,जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी वैभव लॉन खच्चून भरले होते. मेहकर शहरात हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या निमित्ताने भगवा जनसागर लोटला होता. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

 बुलडाणा जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असे  म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाषणाची सुरुवात केली. सोयाबीन सोंगण्याचा हंगाम असताना सुद्धा एवढी गर्दी सभेला येते याचा अर्थ आम्ही घेतलेला निर्णय बरोबर आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले.  बाळासाहेबांचा फोटो लावायचा आम्हाला अधिकार नाही असे ते म्हणतात मात्र तुम्ही त्यांच्या इस्टेटीचे वारस आहात मात्र आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे वारस आहोत असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. 

  अकरा आमदार शिंदे साहेबांसोबत गेले तेव्हा आम्ही २० आमदार उद्धव ठाकरेंना भेटलो आणि एकनाथ शिंदे यांना बोलावून घ्या असे उद्धव ठाकरे यांना म्हटलो मात्र तेव्हा संजय राऊत यांनी काड्या केल्या. उडाले ते कावळे अन राहिले ते मावळे असे संजय राऊत म्हणत होते.आता संजय राऊत गेला जेलात.. अब तेरा क्या होगा कालिया असा खणखणीत टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. सत्ता असताना ते घरात होते आता ते फिरायला लागलेत ,आता आमच्यावर टीका करतात ,पण टिका कुणी करावी हो ? आदित्य ठाकरेच वय ३२, माझे शिवसेनेतील वय ३५ असेही गुलाबराव पाटील म्हणाले.  

 सकाळी ५ वाजेपर्यंत जागणारे आणि धडाधड निर्णय घेणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री मी माझ्या राजकीय आयुष्यात बघितले नाही.जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत बुलडाणा जिल्ह्यावर आणि शिवसेनेवर अन्याय होणार नाही असा शब्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. लोकसभा येऊद्या किंवा विधानसभा कोणत्याही निवडणुका येऊद्या बुलडाणा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहणार असेही गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितले. येणाऱ्या काळात अडीच वर्षाचा बॅकलॉग दोन वर्षात भरून काढू असे गुलाबराव पाटील म्हणाले. जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्यानाश होवो असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाषणाचा समारोप केला.
   
१०० खोके मातोश्री ओके: खासदार प्रतापराव  जाधवांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल..

  आम्ही शिंदे साहेबांसोबत गेल्यामुळे सत्तेसाठी हपापलेले विरोधक एकत्र आले आहे. ते आम्हाला गद्दार म्हणतात मात्र आम्हाला तुम्ही कशावर निवडून दिले असा सवाल खासदार प्रतापराव जाधवांनी उपस्थितांना केला. आम्ही भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो. मात्र २०१९ नंतर आपल्या नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली . भाजपचे आमदार १०६ आणि आपले ५५ होते त्यामुळे इकडे मुख्यमंत्री पद मिळणे शक्य नव्हते म्हणून ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी काहीही करू शकते असा टोला खा. जाधव यांनी लगावला. आमचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ तीनदा मंत्रालयात आले आणि ती नॅशनल न्युज बनली असे खा. जाधव म्हणाले. आमदारांना ,खासदारांना मुख्यमंत्री वेळ देत नव्हते. 

 काही आमदारांना वर्षा बंगल्यावरून धक्का मारून काढून देण्यात येत होते असा आरोप  खा.जाधव यांनी केला. महाविकास आघाडी झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार, एक खासदार होते, लोकसभेत आम्ही ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दोन वेळा पाणी पाजले मात्र त्यांना पालकमंत्री केल्या गेले. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत होती मात्र बुलडाणा जिल्ह्यात मी विरोधी पक्षनेत्याच्या  भूमिकेत होतो असे खा .जाधव म्हणाले. शेवटी उठाव झाला, आधी  बाळासाहेबांचे नाव जाहीरपणे घेऊ शकत नव्हतो, राम मंदिरासाठी आम्ही कारसेवा केली मात्र भूमिपूजन झाल्यावर आनंद साजरा करता आला नाही. ३७० कलम रद्द केल्यानंतर आनंद व्यक्त  करता आला नाही असे खा. जाधव म्हणाले .  पत्रकार आम्हाला शिंदेगट म्हणतात पण हा शिंदेगट नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरेंची ही शिवसेना आहे. दुसरा उद्धव  ठाकरेंचा गट आहे. "गर्व से कहो हम  हिंदू है" असे ते म्हणू शकणार नाही मात्र आम्ही गर्वाने स्वतःला हिंदू म्हणून घेतो असे खा.जाधव म्हणाले. आम्ही गद्दारी केली नाही खरी गद्दारी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केली. आम्हाला गद्दार म्हणायची हौस असेल तर आधी आदित्य ठाकरे  वरळी मतदारसंघातून राजीनामे दे आणि काँग्रेस आणि राष्ट्वादीच्या भवश्यावर निवडून येऊन दाखव असे  खुले आवाहन खासदार जाधव यांनी दिले. विरोधक खोके घेतल्याचा आरोप करतात मात्र खोके आम्ही घेतले नाही ,आम्ही हिंदुत्वासाठी  गेलो मात्र  सचिन वाझे दर महिण्याला १०० खोके मातोश्रीवर पोहचवत होता  मात्र त्यावेळी आम्ही बोलू शकत नव्हतो. १०० खोके मातोश्री ओके असा टोला खासदार जाधव यांनी लगावला.

ही सत्तेची नाही विचारांची लढाई: अर्जुन खोतकर

शिवसेना कुणाची असा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत विचारला जात आहे. शिवसेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच असल्याचे खोतकर म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा समोर घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याचे खोतकर यांनी ठासून सांगितले. ही सत्तेची लढाई नाही विचारांची लढाई आहे. हिंदुत्वाच्या विचारपासून त्यांनी फारकत घेतली होती.मात्र आता हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत असेही खोतकर म्हणाले. गुलाबराव पाटलांनी मंत्रिपदाचा विचार केला नाही कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे गुलाबराव पाटील कडवट हिंदुत्ववादी विचारांचे पाईक आहे असे खोतकर म्हणाले. अनेक मुख्यमंत्री आम्ही बघितले मात्र आपल्याच पक्षाच्या आमदारांना उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते असेही खोतकर म्हणाले.नव्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे ८०० जीआर काढले. आधीच्या सरकार मध्ये असे होत नव्हते असे खोतकर म्हणाले. भाषणाच्या शेवटी "प्रतापराव जाधव साहेब" तुमच्या अन लोकांच्या मनातल बोलतो. असाच एक भव्य दिव्य सत्कार सोहळा करण्याची  संधी  मेहकरच्या लोकांना मिळेल असे खोतकर म्हणाले. यावेळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 
प्रास्ताविक आमदार संजय रायमुलकर यांनी तर सूत्रसंचालन जयचंद बाठीया यांनी केले.