महापुरुषांच्या सन्मानासाठी देउळघाट नगरीत उसळला जनसागर; सन्मान यात्रेची संकल्पना महाराष्ट्रभर राबविण्याची गरज: आ.अमोल मिटकरींचे प्रतिपादन, म्हणाले, २०२३ चा सूर्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

 
jmhg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपच्या वाचाळवीर नेत्यांमध्ये महापुरुषांबद्दल अपशब्द वापरण्याची स्पर्धा लागली आहे. महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल कोट्यवधी जनतेचा तळतळाट त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही. २०२४ मध्ये महाराष्ट्रातून भाजपा हद्दपार होईल. कालचा आणि आजचा सूर्य त्यांचा असला तरी २०२३ चा सूर्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील.  महापुरुषांची सन्मान यात्रा ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची गरज आहे. त्यासाठी पक्षाच्या पातळीवर आपण स्वतः पुढाकार घेऊ असे प्रतिपादन नामवंत   वक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केले. माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून १७ डिसेंबर पासून महापुरुषांच्या सन्मानार्थ निघालेल्या सन्मान यात्रेची समारोपीय सन्मान सभा ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी देऊळघाट येथे झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आ. अमोल मिटकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, यात्रेचे संयोजक बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने, यूवा नेते पुष्पक शिंगणे, मनोज दांडगे, अनुजा सावळे, मनोज बोरकर उपस्थित होते. सभेला आबालवृद्धांची मोठी गर्दी उसळली होती.

पुढे बोलतांना आ. मिटकरी म्हणाले की, मुळात महाराष्ट्रात सन्मान यात्रा घेण्याची वेळ का यावी याबद्दल बोलण्याची गरज आहे. "छत्रपती शिवाजी महाराज पुराने जमाने की बात है" हे वाक्य राज्यपालांच्या ऐवजी एखाद्या मुसलमानाने म्हटल असत तर काय झालं असत? असा सवालही त्यांनी केला.महापुरुषांबद्दल अपशब्द वापरण्याची  भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कुणी विचारलं नसत असा एकेरी उल्लेख राज्यपालांनी केला.राज्यपाल महोदय, महाराष्ट्रात आलात तर आधी महाराष्ट्राचा इतिहास वाचा. मा जिजाऊ,छत्रपती शहाजी महाराज शिवाजीमहाराजांचे गुरू होते, संत  तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. ज्यांनी इतिहासच वाचला नाही त्यांनी आम्हाला इतिहास शिकवू नये असेही आ. अमोल मिटकरी म्हणाले. यावेळी मिटकरी यांनी भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची  यादीच वाचून दाखवली. राज्यपाल कोश्यारी, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत पाटील, आ.प्रसाद लाड  यांच्या वक्तव्यांचा आ. मिटकरी यांनी खरपूस समाचार घेतला. कालचा सूर्य त्यांचा होता,आजचा सूर्यही त्यांचाच पण २०२३ चा सूर्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, आपला शब्द कधी खोटा जात नाही असे अमोल मिटकरी म्हणाले. शिंदे सरकारच्या ६ महिन्यांच्या काळात दिडशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असे आ. मिटकरी म्हणाले.

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा सुरू केल्याचे विधान केले. यावर बोलतांना आ. मिटकरी म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली. त्यांनी त्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या अंगावरील २०० तोळे सोने विकले, स्वतःची शेती विकली. त्यांनी कमवा व शिका मंत्र दिला. महात्मा ज्योतिबा फुले हे त्याकाळात जमशेदजी टाटा यांच्यापेक्षा श्रीमंत होते. २०० एकर ओलिती जमीन महात्मा फुलेंकडे होती. त्यांनी कात्रजचा बोगदा बांधला. महात्मा फुलेंचे वार्षिक उत्पन्न त्याकाळात १२ हजार रुपये होते असे आ. मिटकरी म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्थव्यवस्थेचे जनक होते. चंद्रकांत पाटील तुम्ही कुणाबद्दल बोलताय याचा जरा विचार करा असेही आ. मिटकरी म्हणाले. सध्या लव्ह जिहाद चा मुद्दा भाजपच्या नेत्यांकडून उपस्थित केल्या जात आहे. मुख्तार अब्बास नक्वी भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांची पत्नी रेणू शर्मा आहे, मग हा लव्ह जिहाद नाही का? असा सवालही त्यांनी त्यांच्या शैलीत उपस्थित केला. भाजप आणि संघाच्या लोकांकडून हिंदू मुसलमान समाजात जातीय तेढ निर्माण केल्या जात आहेत. त्यांना धडा शिकविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
   
महापुरुषांच्या अपमानाचा तळतळाट लागेल..

२०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपा येणार नाही. महापुरुषांचा त्यांनी जो अपमान केला त्याचा तळतळाट त्यांना लागेल. अपमानाचा बदला घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही असेही आ. मिटकरी म्हणाले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी मोठ मोठे आश्वासन दिले. २ कोटी रोजगार देईल असे ते म्हणाले मात्र त्यांना रोजगार तर देता आलाच नाही, याउलट ज्यांच्याकडे रोजगार होता तो हिरावल्या गेल्याचेही ते म्हणाले.भाजपचे दिवस आता संपले आहेत असा टोलाही आ. मिटकरी यांनी लगावला. आपल्या ५२ मिनिटांच्या भाषणात आ. मिटकरी यांनी उपस्थितांची मने जिंकली.  भाषणादरम्यान क्षणाक्षणाला पडणाऱ्या टाळ्या लक्ष वेधून घेत होत्या. 
    
महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना पदावर रहायचा अधिकार नाही: नाझेर काझी

या देशासाठी हजारो महापुरुषांनी आपले बलिदान दिले. देशासाठी बलिदान देणारे हिंदू होते आणि मुस्लिमही. मात्र देशाच्या जडणघडणीत मुसलमानांचा काहीच वाटा नव्हता असा आव भाजपच्या नेत्यांकडून आणल्या जात असल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला.  महाराष्ट्रात पहिल्यांदा सन्मान यात्रा काढण्यात आली. हे कुणाला सुचलं नाही पण दत्तात्रय लहाने सरांच्या संकल्पनेतून निघालेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल दत्तात्रय लहाने सरांचे अभिनंदन.  ही संकल्पना आता महाराष्ट्राच्या पातळीवर राबविण्यात येणार असल्याचेही म्हणाले. यावेळी काझी यांनी महापुरुषांबद्दल अपशब्द वाचविणाऱ्या नेत्यांची यादीच वाचून दाखवली. प्रास्ताविकात यात्रेचे संयोजक दत्तात्रय लहाने यांनी यात्रेची भूमिका विषद केली. महापुरुष गावापुरते मर्यादित नाहीत. त्यांना संकुचित करू नका. महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी काम केले आहे. ते आमचे मायबाप आहेत, आमची अस्मिता आहेत असे श्री. लहाने म्हणाले. यावेळी मनोज दांडगे, अनुजा सावळे यांचेही समयोचीत भाषण झाले.