चिखलीत शेतकऱ्यांचा अतीविराट मेळावा! उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; जिल्ह्यातल्या "त्या" खासदार आमदारांनाही केले लक्ष, म्हणाले इथे जुने चेहरे दिसत नाहीत, ते फसवे होते गद्दार निघाले!

संजय राऊतही गरजले, म्हणाले सर्वाधिक खोके बुलडाणा जिल्ह्यात आले..! पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख करतील

 
चिखली( कृष्णा सपकाळ बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मी इथे आलो मात्र आता काही जुने चेहरे दिसत नाहीत. जुने होते ते फसवे निघाले,गद्दार निघाले. इथले हे चेहरे सगळ्या धगधगत्या मशाली आहेत. शेतकऱ्यांनो नाउमेद होऊ नका, आत्महत्या करू नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. उद्यापासून शिवसेनेचे सगळे नेते, पदाधिकारी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहेत असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज,२६ नोव्हेंबरला चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात केले. यावेळी राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय केंद्र सरकारचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी मंचावर खा.संजय राऊत, खा. अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे,  छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे,  बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, छगन मेहेत्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असे म्हणून उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच सभास्थळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाली. ही गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंच्या आशिर्वादानेच याची सुरुवात करू असेही ते म्हणाले. आज संविधान दिन आहे मात्र सविंधान आज सुरक्षित आहे का? आपल्याला आज लोकशाही पाहिजे की हुकूमशाही ? यावर विचार करण्याची गरज आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पदाची शपथ गेल्यानंतर मी तुळजापूर आणि अयोध्येला गेलो होतो मात्र हे तिकडे गेले गुवाहाटीला   असे  म्हणत उद्धव ठाकरेंनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला  गेलेल्या शिंदे गटाच्या आमदार खासदारांना टोला लगावला.आज बल्डण्यात आलो जुने चेहरे दिसत नाही, पण जुने होते ते फसवे होते, ते गद्दार निघाले मात्र इथे जमलेल्या सगळ्या धगधकत्या पेटत्या मशाली आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांना तिकडे आशीर्वाद घ्यायला जायची गरज पडली मी तुम्हा शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे असेही उद्घव ठाकरे म्हणाले.भाजपा आज आयात पक्ष झाला आहे, विचार संपले आहेत नेते संपले आहेत असेही ते म्हणाले. आयात पक्षाची दादागिरी आपले मर्द मावळे मोडून काढतील असे ते म्हणाले. भाजपा हा पक्ष आहे की चोर बाजार असा सवालही त्यांनी केला. जे तिकडे गेले त्यांच्यात मर्दानगी असेल तर सांगा,  भाजपच्या मदतीशिवाय निवडणून येऊन दाखवा असे आवाहनही त्यांनी दिले. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुका जिंकण्यासाठी तिकडे नेण्यात येत आहेत. पुढच्या वर्षी कर्नाटकच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कर्नाटक निवडणुका जिंकण्यासाठी ते महाराष्ट्राचे तुकडे करतील , ते तुम्ही होऊ देणार आहेत का असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. महाराष्ट्राचे तुकडे झाले तर आमचा विठोबा तिकडे जाईल , स्वामी समर्थ तिकडे जाईल..मात्र आम्ही हे सहन करणार नाही असेही ते म्हणाले. 

राज्यपालांची बॅग बांधा...

छत्रपतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांची बॅग पॅक करण्याची गरज आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या वयाचा आम्ही सन्मान करू मात्र तुमच्या काळ्या टोपीखाली जे दडल ते आम्ही सहन करणार नाही असेही ठाकरे म्हणाले.अब्दुल गट्टारांनी सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर महिलेचा अपमान करणाऱ्यांना लाथ मारून हाकलले असते ते म्हणाले. 

शेतकऱ्यांना म्हणाले..

पिकविम्याचे पैसे मिळाले का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारला. त्यानंतर उद्धव  ठाकरे यांनी कोलारा येथील शेतकरी गजानन सोळंकी यांना मिळालेल्या विम्याच्या पैशाचा हिशोबच समोर मांडला. शेतकऱ्यांची डीपी जळल्यानंतर त्यांना लवकर डीपी दुरुस्त करून मिळत नाही.शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झाले पाहिजे , ते तुम्ही करून दाखवा असे जाहीर आव्हान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिले. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्यांची वेळ येऊ दिली नसती असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी केवळ माझे दुःख सांगायला आलेलो नाही तर तुमच्या दुःखात मी सहभागी असल्याचे सांगायला आलो आहे असे ठाकरे म्हणाले. या मिंधे सरकारकडून आता आशा अपेक्षा राहिले नाही. या गद्दारांच करायचं काय खाली मुंडक वर पाय...पण त्यांना डोकं असेल तर करता येईल ना असा टोला  उद्धव ठाकरे यांनी लगावला. आपण हिंदुत्व सोडल्याचा त्यांनी अपप्रचार केला, का तर आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणून..पण कश्मिर मध्ये ते महबूबा मुफ्ती सोबत मांडीला मांडी लावून बसले ते काय होते असा सवालही त्यांनी विचारला. 

गद्दारीचा टिळा पुसल्या जाणार नाही..

 जे स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना सोडून गेले आता त्यांच्या कपाळावरील गद्दारीचा
टिळा पुसल्या जाणार नाही असेही ते म्हणाले. गद्दार आता माफीच्या लायकीचे राहिले नाहीत. शेतकऱ्यांनो आता नाउमेद होऊ नका, तुमच्या मनगटात प्रचंड ताकद आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांनी मस्तवाल शेतकऱ्यांना त्यांनी त्यांची जागा दाखवली. कितीही संकट मोठ असल तरी आत्महत्या करणार नाही अशी शपथ घ्या असे ते शेतकऱ्यांना  म्हणाले. उद्यापासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरा असे आदेश त्यांनी भाषणाच्या शेवटी शिवसेना पदाधिकाऱ्यांना,नेत्यांना दिले.
    
पेटलेल्या मशाली गद्दारांचे खोके बेचिराख करतील: संजय राऊत
   
शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाषणाची सुरुवात शिवसेनेचे चिन्ह काय असे विचारून केली. यावेळी गर्दीतून मशाल मशाल असे उत्तर आले. शिवसेनेचं चिन्ह काय हे आता सांगायची गरज नाही, या पेटलेल्या मशाली गद्दारांची खोके बेचरा केल्याशिवाय राहणार नाही असे संजय राऊत म्हणाले. ज्या भूमीने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्या भूमीत गद्दारीची बीजे रोवली आहेत हे दुर्दैवी आहे. ते तिकडे गुवाहाटीला दर्शनासाठी गेले, महाराष्ट्राचे देव संपले का? आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले मात्र एकनाथ शिंदे ४० रेड्यांचा बळी द्यायला गेले आहेत असे संजय राऊत म्हणाले. मी ११० दिवस तुरुंगात होतो. जातांना माझ्यासोबत भगवा  होता, तो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहील असेही संजय राऊत म्हणाले. मला जन्मठेप झाली तरी चालेल मात्र मागे हटणार नाही. तुम्ही गद्दार खासदार आमदारांना विकत घेतले मात्र हे लाखो शिवसैनिक आणि त्यांची निष्ठा तुम्हाला विकत घेता येणार नाही असेही संजय राऊत म्हणाले. सर्वाधिक खोके बुलडाणा जिल्ह्यात आले, १ फुल २ हाफ, १ खासदार २ आमदार असे खा.संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राला इतिहास आहे  तो जिजाऊंच्या बुलडाणा जिल्ह्यामुळे असेही संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा संकल्प जिजाऊंच्या या भूमीतून झाल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेनेचे २५ खासदार आणि ११५ आमदार निवडून येणार असून शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच. तुम्ही वतनदार, सरंजाम फोडले मात्र हे शिवसेनेचे मावळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भगवा फडकवतील असे खा.संजय राऊत म्हणाले.
   
आता त्यांचे दिवस काढणे सुरू: खा.अरविंद सावंत  ३३ वर्षांपूर्वी याच मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाल्याची आठवण खा. अरविंद सावंत यांनी करून दिली. काल, कुणाचा तरी "काढदिवस" सुरू होता, त्यांचे आता दिवस काढणे सुरू आहे असा टोला खा. सावंत यांनी खा. प्रतापराव जाधव यांना लगावला. 
   
मातोश्रीचा सर्वात मोठा लाभार्थी गद्दार निघाला: नरेंद्र खेडेकर

मागच्या जून महिन्यात शिवसेनेने ज्यांना सगळं काही दिलं गद्दार निघाले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यात दुर्दैवानं बुलडाणा जिल्ह्याचा मोठा वाटा होता. आता जिल्हा दोन गद्दार आमदार आणि खासदाराच्या नावाने ओळखला जातो. मातोश्री चा सर्वात मोठा लाभार्थी या जिल्हयाचा खासदार, तीनदा आमदार , तीनदा खासदार, मंत्रीपद तरीही गद्दारी. तीनदा आमदारकी मिळालेला आ. रायमुलकर गद्दार, तीन चारदा निवडणुका लढवून ज्याच कुठ जमल नाही तो शिवसेनेकडून आमदार झालेला बुलडाण्याचा आमदारही गद्दार असा टोला जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी लगावला. 

ही आमच्या कामाची पावती: जालिंधर बुधवंत बुलडाणा जिल्ह्यात गद्दारी झाली. १ खासदार आणि २ आमदारांनी शिवसेना सोडली. मात्र गद्दारी झाल्यानंतरही या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक, शेतकरी उपस्थित झालेत. हीच आमच्या कामाची पावती आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले.मेळाव्याचे बहारदार सूत्रसंचालन पत्रकार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गजानन धांडे यांनी केले.