बच्चू कडू यांच्या अपघातामागे आ.अमोल मिटकरी यांचाही हात असू शकतो,कारण..! भाजपच्या विनोद वाघांचा आ. मिटकरींवर निशाणा
Jan 13, 2023, 08:39 IST

सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होत असताना, राजकीय मंडळींचे आरोप-प्रत्यारोप चर्चेत येत आहे.आ अमोल मिटकरी यांनी आ. बच्चू कडू यांच्यावर केलेल्या विधानावर भाजप प्रवक्ता विनोद वाघ यांनी पलटवार केला.
मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याने हे सरकार अडचणीत आहे. सरकार लवकर कोसळेल. आ. बच्चू कडू यांची मागणी बरोबर आहे पण त्यांचा अपघात झाला.आता हा अपघात होता की सत्ताधाऱ्यानीच त्यांचा घातपात केला, याची चौकशी करण्याची मागणी मी कालच केली आहे. असे आ. अमोल मिटकरी प्रसारमाध्यमासमोर म्हणाले होते.
दरम्यान या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी पलटवार केला.विनोद वाघ म्हणाले की, अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू बाबत घातपात झाल्याचे म्हटले. हे कृत्य आताच्या सरकारचे असल्याचेही ते म्हणाले. परंतु मिटकरी यांना उपचाराची खरी गरज आहे. याआधी बच्चू कडू व मिटकरी यांच्यात बऱ्याच वेळा बाचाबाची झालेली आहे.त्यामुळे या घातपात प्रकरणात मिटकरींचाच हात असू शकतो. या प्रकरणाची चौकशी जर झाली तर त्यांचे नाव पुढे येऊ शकते,अशी प्रतिक्रिया विनोद वाघ यांनी दिली.