९५ टक्के कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई! आ. संजय गायकवाडांच्या वक्तव्याने नवा वाद!
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी १४ मार्चपासून शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. खासदार,आमदारांची पेन्शन बंद करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागल्याने आ. संजय गायकवाड यांनी मिळणाऱ्या पेन्शनपेक्षा आम्हाला पाच लाखांचा खर्च करावा लागतो, असे कर्मचाऱ्यांना सुनावले. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. गायकवाड म्हणाले, ९५ टक्के कर्मचाऱ्यांकडे हरामाची, बाहेरची कमाई असली तरीही मुख्यमंत्री उदार आहेत, देण्यासाठी तयार आहेत; पण एका फटक्यात निर्णय होऊ शकत नाही. कारण एकाचवेळी हा निर्णय घेतला तर २०३२-३३ ला जे सरकार येईल, ते कोलमडून जाईल. ५ टक्केच कर्मचारी इमानदार असल्याचे सांगत गायकवाड म्हणाले की, त्या ९५ टक्क्यांमध्ये चपराशीही सुटत नाही. तो देखील आत जायचे शेतकऱ्याला पैसे मागतो. लोक ऑफीसमध्ये गेल्यास कर्मचाऱ्यांची लोकांच्या खिशाकडेच नजर राहते की, हा किती पैसे काढेल म्हणून ! खरोखर इमानदारीने पेन्शन हवी असेल तर कर्मचाऱ्यांनी शपथ घ्यावी.कोणाकडूनच रुपयाही खाणार नाही, सरकारचे नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारी तिजोरीत जावू देऊ, तेव्हाच सरकारची तिजोरी भरेल आणि मग यांना शासन पैसे देईल.
आ. संजय गायकवाड हे सत्ताधारी आमदार आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे असल्याची चर्चा सामान्य जनतेतून होऊ लागली आहे.
आधी लायकी सिद्ध करा
यावेळी बोलताना आ. संजय गायकवाड म्हणाले, सरकारला लुटायचे, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा आणि मोठ्याने सांगायचे पेन्शन द्या म्हणून. आधी लायकी सिद्ध करा, असे सांगतानाच आमदाराने सांगूनही हे कर्मचारी काम करत नाहीत. खरोखर कर्तव्य जर पाळलं, तर जसं इंग्रजांच्या काळात कुणी रुपया खात नव्हता, तशी शपथ घ्यावी की, या देशात कधीच पैसा खाणार नाही, शेतकऱ्यांना त्रास देणार नाही, कामे वेळेत करू. तेव्हाच आम्ही सांगू त्यांना जुनी पेन्शन द्या, असेही आ. गायकवाड म्हणाले.