बुलडाणा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी 80.47% मतदान; 3 लाख,3 हजार 490 जणांनी केले मतदान! उद्या 'कही खुशी कही गम'दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला! वाचा कुठे किती झाले मतदान...!!
स्थानिक स्वराज्य संस्था व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारासाठी जोर लावला. दरम्यान 374125 मतदारांपैकी 303490 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.आता निकालाकडे लक्ष लागले असून उद्या 'कही खुशी,कही गम'चे चित्र दिसणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतला येतो.थेट सरपंच निवडीच्या निमित्ताने अधिकार ही वाढल्याने सरपंचपद प्रतिष्ठेचे झाले आहे. बहुमत हो ना हो सरपंच आपला पाहिजे यासाठी वाटेल ती 'किंमत' उमेदवारांनी मोजल्याचे बोलले जात आहे. 'अभी नही तो कभी नही' अशी भूमिका उमेदवारांनी घेतली. आणि कमालीचा कलगीतुरा रंगल्यानंतर काल रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे गणित समोर ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेत्यांनी राजकीय वर्चस्वासाठी मर्जीतल्या उमेदवाऱ्या देत प्रतिष्ठा पणाला लावली.दरम्यान कोण-कोणते उमेदवार बाजी मारतात? याची उत्सुकता लागून आहे.
उद्या मतमोजणी
उद्या 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी कोणाला कौल दिला हे समोर येईल. सरपंचपदावरील निवड ही जनतेतून होणार असल्याने काही ठिकाणी बहुमत एका बाजूला आणि सरपंच दुसर्याच पक्षाचा निवडूण येणार असल्याची शक्यता आहे.त्यामुळे भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
पहा कुठे किती झाले मतदान
बुलडाणा 26777 पैकी 18163 (67.43), चिखली 34011 पैकी 27133 (79.78),
देऊळगाव राजा 23228 पैकी 19462 (83.78), सिंदखेडराजा 45977 पैकी 38332 (83.37),मेहकर 62033 पैकी 52362 ( 84.41), लोणार 58336 पैकी 48062 (82.39), खामगाव 18242 पैकी 15001(82.23), शेगाव 9439 पैकी 7990 (84.55), जळगाव जामोद 15546 पैकी 12428 (79.94), संग्रामपूर 28133 पैकी 21419 (76.13),नांदुरा 20102 पैकी 16262 (80.90), मोताळा 21211 पैकी 15921(75 .06),मलकापूर 14090 पैकी 10955 (77.75)