विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ४९७ मतदार! जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, "अशी होणार निवडणूक."

 
parished
( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी एच.पी.तुम्मोड म्हणाले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.

५ जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना, तर ३० जानेवारी रोजी मतदान होऊ घातले आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील पदवीधरांसाठी ही निवडणूक असून बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ४९७ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी सहाययक जिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, निवडणूक विभागाचे तहसीलदार सुनील आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पदवीधर आ. डॉ. रणजित पाटील यांचा कालावधी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी समाप्त होत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने चालविली आहे. ५ जानेवारी रोजी अधिसूचना, १२ जानेवारीला नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक राहणार आहे. १३जानेवारीला छाननी प्रक्रिया, १६ जानेवारी रोजी उमेदवारी मागे घेणे, ३० जानेवारी रोजी मतदान, २ फेब्रुवारी मतमोजणी तर ४ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या निवडणुकीत पात्र पदवीधर मतदारांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तुम्मोड यांनी केले आहे.

बुलडाणा  तालुक्यात सर्वाधिक मतदार..!

पदवीधर मतदारसंघात बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यामध्ये १ लाख ८६  हजार ३६०  मतदार आहेत. तर बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ४९७ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये २६ हजार १६१ पुरुष तर १० हजार ३३६ महिला मतदारांचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ३६६ मतदार तर सर्वात कमी मतदार मोताळा तालुक्यात आहे.

जिल्ह्यातील मतदार असे 

मलकापूर तालुक्यामध्ये २२०४, जळगाव जामोद २२८७, संग्रामपूर१०४२, शेगाव २५६२, नांदुरा २४५२, धामणगाव बढे ३८७, मोताळा १११३, धाड ५५९, बुलडाणा ६३६६, खामगाव४८४७, अमडापूर ३५६, चिखली ४०३२, मेहकर २०४४, डोणगाव ७३९, जानेफळ ५१५, विवेकानंद नगर ३४७, देऊळगाव मही ४४५, देऊळगाव राजा १३३०, सिंदखेडराजा ५३३, दुसरबीड ३९२,साखरखेर्डा ४९१, लोणार १५२६, असे एकूण ३६ हजार ४९७  मतदारांचा समावेश आहे.