५ पैकी ३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकासआघाडीचा झेंडा!
आ.संजय गायकवाड, आ.आकाश फुंडकरांना जमल नाही! मेहकरात कडक फाईट वातावरण टाईट! देऊळगावराजात डॉ. राजेंद्र शिंगणेच "बॉस" ; खामगावात सानंदांना आनंद तर मलकापुरात संचेतींना चैन - सुखाचे दिवस!
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या १० पैकी ५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी काल,२८ एप्रिलला मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालात जिल्ह्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट आहे. ५ पैकी ३ बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. मलकापूरात चैनसुख संचेतीच्या नेतृत्वाखाली भाजपने दणदणीत विजय मिळवला तर मेहकरच्या चुरशीच्या लढतीनंतर खा. जाधवांच्या भूमिपुत्र पॅनलने विजय मिळवला. मेहकरात खा. जाधवांच्या भूमिपुत्र पॅनलला ११ तर महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या. मतमोजणी सुरू असताना विजयी झाल्याचे समजून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, "पन्नास खोके एकदम ओके"चे नारे दिल्या गेले त्यामुळे वातावरण टाईट झाले. अंतिम निकालानंतर मात्र खा. जाधवांनी त्यांचा गड वाचवला मात्र यावेळी त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चुरशीची ठरली. महाविकास आघाडीची एकजूट इथे आ. संजय गायकवाडांच्या नेतृत्वातील शिवसेना - भाजपच्या पॅनलवर वरचढ ठरली. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीला १२ तर शिंदेची शिवसेना आणि भाजपला ६ जागा मिळाल्या, त्यामुळे पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीवर बुधवंत राज पहायला मिळणार आहे. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सहकारातील वर्चस्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. १८ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचे पॅनल विजयी ठरले तर ३ जागा भाजप - सेना युतीला मिळाल्या.
खामगावात सानंदांना आनंद..
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार सानंदा यांनी त्यांचा गड शाबूत ठेवला. आमदार आकाश फुंडकर यांनी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मात्र यश मिळाले नाही. १८ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडी तर ३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या सत्तेपासून दूर असलेल्या सानंदांना दिलासा मिळाला आहे.
मलकापुरात संचेतींना चैन -सुखाचे दिवस..!
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकतर्फी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसची सत्ता उलथवून लावत माजी आमदार चैनसुख संचेती यांनी भाजप - शिवसेनेचा झेंडा फडकवला. १५ वर्षांपासून इथल्या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते, ते आता संपुष्टात आले आहे. भाजप शिवसेनेच्या पॅनलला १६ तर विरोधकांना २ जागा मिळाल्या.