२९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही होणार ओबीसी आरक्षणविनाच ? 'सुप्रिम' निकालाने बहुजन बांधवांत धास्ती !
Wed, 4 May 2022

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओबीसी आरक्षणाचा गुंता कायम असल्याने व सुप्रिम कोर्टाच्या निकालाने यंदाच्या वर्षात होऊ घातलेल्या २९१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षण विनाच पार पडतील की काय अशी राजकीय- सामाजिक धास्ती ओबीसी बांधवांना पडली आहे. असे झाले तर इतर मागासवर्गीय किंबहुना अठरापगड जाती बांधवांची मोठी राजकीय संधी हुकणार आहे.
जिल्ह्यातील ३९१ ग्रामपंचायतींची निवडणूक चालू वर्षात होणार आहे. यातील ८ ग्रामपंचायती २०२१ मधेच रिक्त झाल्या आहे. चालू वर्षात तब्बल २८१ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. याशिवाय नव्याने स्थापित २ ग्रामपंचायत ची निवडणूक देखील याचवर्षात होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा गुंता कायम असतानाच न्यायालयाने नुकतेच दिलेल्या निकालात ओबीसीआरक्षण शिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. हा सर्वोच्च निकाल असल्याने ओबीसी बांधवांत धास्ती निर्माण होणे स्वाभाविक ठरते.
या जागा ओपन होणार असल्याने आता त्यांना व्यापक स्पर्धेला तोंड देणे भाग पडणार आहे. ओपन मधून सवर्णच काय अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरीक देखील लढू शकतात. निवडणूकच काय अध्यक्ष, सभापती पदासाठी असणारे ओबीसी आरक्षण सुद्धा धोक्यात येऊ शकते. यामुळे ओबीसीची सामाजिक राजकीय भीती चिंतेचा विषय ठरावी.