२२ हजार ६०० मतदार ठरवणार अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कलचा सदस्य! १० हजार ७०३ महिला मतदार

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची वाट पाहून असणाऱ्या भावी उमेदवारांना, मतदारांना आज, २० जुलैचा दिवस म्हणजे दुहेरी गुड न्यूज देणारा ठरलाय. दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सकारात्मकरित्या निकाली काढल्यानंतर आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. दुसरे म्हणजे निवडणुकांची तयारी करणाऱ्या जिल्हास्तरावरील निवडणूक विभागाने आजच्याच मुहूर्तावर मतदार याद्या जाहीर करून निवडणुकीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. 

नव्या रचनेत बनलेल्या अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कलकडे यंदा अनेकांच्या नजरा लागल्यात. तसे पाहिल्यास अंचरवाडी जिल्हा परिषद गट सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात येत असला तरी या मतदासंघातील सामाजिक गणितामुळे तसेच दोन्ही गण चिखली पंचायत समितीत असल्याने चिखली विधानसभा मतदार संघातील नेत्यांचेही या गटाकडे लक्ष राहील.

मागील वेळेस झालेल्या निवडणुकीत  भाजपने ही जागा जिंकली होती. चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी विशेष लक्ष घातल्याने भाजपने गुलाल उधळला होता. यावेळेसही भाजप आपली जागा राखण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार असून नव्या दमाच्या, स्वच्छ चारित्र्याच्या, उच्च शिक्षित तरुण उमेदवाराला भाजपा संधी देण्याची शक्यता आहे.  आमदार श्वेताताई महाले आणि जेष्ठ नेते सतीश गुप्त या जागेकडे विशेष लक्ष ठेवून राहतील. काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे भवितव्य सध्या न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने तयारी करणारे संभाव्य उमेदवार संभ्रमात आहेत.
  
  आज २० जुलै रोजी जाहीर झालेल्या मतदार यादीनुसार २२ हजार ६०० मतदार या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. यात १० हजार ७०३ महिला मतदार आहेत. अंचरवाडी पंचायत समिती गणात १२ हजार २२७ मतदार असून मेरा खुर्द गणात १० हजार ३७३ एव्हढे मतदार आहेत.