पिकविमा,अतिवृष्टीची मदत न मिळाल्यास १६ जूनला शेतकऱ्यांसह एआयसीच्या मुंबई कार्यालयाच्या २० व्या मजल्यावरुन उड्या मारु!
रविकांत तुपकरांचा निर्वाणीचा इशारा! सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा केला आरोप
सोयाबीन - कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीची मदत यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर शेतकऱ्यांना घेऊन सातत्याने आंदोलन करीत आहेत. एल्गार मोर्चा, मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर बुलढाण्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन आणि त्यानंतर आत्मदहन आंदोलन केले. एवढे करुनही सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत नाही त्यामुळे आता आरपारची लढाई म्हणून शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत धडक देत विसाव्या मजल्यावरुन उड्या मारण्याचा इशारा दिला आहे. ९ जून रोजी स्थानिक विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी बोलतांना तुपकरांनी सांगितले की, पेरणी तोंडावर आली असून शेतकरी हतबल आहेत. पिककर्ज वाटप नाही, अनुदानाच्या रक्कमेवर होल्ड लाऊन परस्पर रकमा कर्ज खात्यात जमा केल्या जात आहे. बॅंकांवर कुणाचाही वचक नाही. उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी बॅकांवर गुन्हे दाखल करु असे आश्वासन दिले होते परंतु एकाही बॅंकेवर कारवाई झाली नाही सोयाबीन - कापसाला भाव नसल्याने आजही साठ टक्के सोयाबिन - कापूस घरात पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पेरणीची चिंता आहे. शेतकरी त्रस्त असतांना मुख्यमंत्री पर्यटनाला गेले आहेत तर सत्ताधारी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत. बोलतांना शेतकऱ्यांच्या बाजूने आणि वागतांना शेतकऱ्यांच्या विरोधात अशी दुट्टपी भूमिका सरकारची आहे, असा आरोप यावेळी तुपकरांनी केला.
जलसमाधी आंदोलनाच्या वेळी १०४ कोटी व आत्मदहन आंदोलनाच्या वेळी १० आणि ४२ असे एकूण १६० कोटी रुपये पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. अजूनही ६२ हजार २४८ शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून बुलढाणा व वाशिम जिल्ह्यासाठी आम्ही १७४ कोटी मंजूर करुन घेतले असून यातील ७० टक्के रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. ३१ मे पर्यंत पिकविम्याचे सगळे पैसे मिळतील असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले होते, परंतु त्यांचे आश्वासन फोल ठरले तर त्यानंतर सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देखील मिळाली नाही. एआयसी पिकविमा कंपनीच्या विरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झाला परंतु बुलढाण्यात तक्रार देऊन अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही, सरकार या कंपनीला पाठिशी घालत असल्याचा आरोपही तुपकरांनी केला आहे.
सरकारने तातडीने पिकविम्याची रक्कम अदा करावी, सोयाबीन - कापसाची दरवाढ करावी, सप्टेंबर - ऑक्टोंबरची मंजूर झालेली व त्यानंतरच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी, पेरणीपूर्वी शंभर टक्के पीककर्ज वाटप करावे, जिल्हा बँकेने भरुन घेतलेले पिककर्ज पुन्हा द्यावे, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतकऱ्यांना पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी यासह इतर मागण्या सरकारने १५ जून पर्यंत पूर्ण न केल्यास हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत धडक देत एआयसी पीकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मार्केट मध्ये २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. आमचा जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील हे सांगायलाही तुपकर विसरले नाहीत.
यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, श्याम अवथळे, गजानन कावारखे, नामदेव पतंगे, विनायक सरनाईक, नितीन राजपुत, शेख रफिक, सहदेव लाड, दत्त्ता जेऊघाले, ज्ञानेश्वर खरात, रामेश्वर अंभोरे, अमोल मोरे, महेंद्र जाधव, मारोती मेढे, उमेश राजपूत, पवन भारसाकळे, संदीप मुळे, सुधाकर तायडे, गजानन देशमुख, हरी उबरहंडे, अरुण पन्हाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
बोगस बियाणे, बोगस जैविक औषधे व खतांबाबत कारवाई करावी
सध्या लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना नको ते खत माथी मारले जात आहे. बोगस बियाणे विक्री केल्या जात असून जड भावाने खते व बियाणे विकल्या जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत परंतु याबाबत कारवाई होत नाही. कृषी विभाग, गुण नियंत्रक व विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यानेच कारवाई होत नाही, असा आरोप तुपकरांनी केला असून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी तुपकरांनी केली. तसेच सध्या बोगस जैविक औषधांची विक्री केली जात आहे त्यामध्ये विषारी घटके आढळून येत आहेत. त्यातून विषबाधा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेशमधील २१ हजार कंपन्या असे जैविक औषधे बनवतात. यातील बहुतांश कंपन्या विना परवाना व बोगस आहेत. याबाबत तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती रविकांत तुपकरांनी दिली.