बुलडाण्याचा खासदार ठरवला ११ लाख ५ हजार ७६१ मतदारांनी! २०१९ च्या तुलनेत टक्काही घरसला अन् आकडाही! शेवटच्या १ तासात धो धो मतदान! कुणाचा फायदा कुणाचे नुकसान? ४ जूनला कळणार....
Apr 27, 2024, 18:09 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी काल २६ एप्रिल ला मतदान झाले. २१ उमेदवारांचे भाग्य आता मशीन बंद झाले आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज २७ एप्रिलला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार यंदा २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्काही घसरला अन् आकड्यातही घट झाल्याचे दिसले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर केवळ ५३ टक्के मतदान झाले होते मात्र शेवटच्या १ तासात धो धो मतदान झाले..त्या एका तासाच्या खेळामुळे ६२.०३ टक्के एवढी सन्मानजनक टक्केवारी गाठता आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६३.६० टक्के इतके मतदान झाले होते.
आकड्यांच्या हिशोबात बोलायचे झाल्यास एकूण १७ लाख ८२ हजार ७०० मतदारांपैकी ११ लाख ५ हजार ७६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लिंगनिहाय मतदानाबद्दल बोलायचे झाल्यास ६ लाख ३ हजार ५२५ पुरुष मतदारांनी तर ५ लाख २ हजार २२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे १० तृतीयपंथी यांनी देखील लोकशाहीच्या महोत्सवात सहभाग घेतला. २०१९ मध्ये ११ लाख २१ हजार १५१ मतदारांनी मतदान केले होते यंदा त्यात एवढ्या १५३९० मतांची घट झाली आहे.
शेवटच्या एका तासात धोधो मतदान! तब्बल पावणेदोन लाख मतदानाची नोंद
काल झालेल्या मतदानाच्या शेवटच्या एका तासात सुमारे पावणेदोन लाख मतदान झाले. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची गती धीमी अन चिंताजनक ठरली. उमेदवार, राजकीय पक्ष नेतेच नव्हे जिल्हा प्रशासन व निवडणूक यंत्रणा देखील अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान केवळ ५३ टक्के मतदान झाले. १७ लाख ८२हजार ७०० पैकी ९,३१,२४९ मतदारांनीच हक्क बजावला.
यामुळे शेवटच्या ५ ते ६ या तासाच्या कालावधीत फार तर ५९ ते ६० टक्के मतदानाचा भल्याभल्यांचा अंदाज होता. मात्र तो चुकीचा ठरवत एका तासांत तब्बल १,७४,५१२ मतदारांनी मतदान करीत सुखद धक्का दिला. अनेक ठिकाणी रात्री साडेसात पर्यंत मतदान प्रक्रिया चालली. यामुळे मतदानाची टक्केवारी तब्बल ६२.०३ टक्केपर्यंत गेली असून ११, ०५,७६१ मतदारांनी मतदान करून जिल्ह्याची शान राखली.
विधानसभा निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे
बुलडाणा ५३.९६, चिखली ६२.२१, सिंदखेडराजा ६१.३४, मेहकर ६४.८४, खामगाव ६६.२७ आणि जळगाव ६३.५८, एकूण ६२.०३ टक्के.