विद्यार्थिनीवर तरुणाने बलात्कार केला, मित्रांनी व्हिडिओ बनवला!

 

गया ः बिहार राज्‍यातील गयामध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्‍काराची घटना समोर आली आहे. तरुणाने बलात्‍कार केलाच, पण तिच्या मोठ्या बहिणीवरही बलात्‍कार करण्याची धमकी दिली. तिच्यावर तो बलात्कार करत असताना त्‍याच्‍या मित्रांनी व्हिडिओ बनवला. आपल्यामुळे बहिणीच्या लग्नात विघ्न येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन मुलगी टेकडीवर आत्‍महत्‍येसाठी निघाली. पण नागरिकांनी तिला वाचवले. या घटनेतील आरोपी तरुण हा पोलिसाचाच मुलगा असल्याने प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेले असून, एसएसपी आदित्‍य कुमार यांनी या घटनेची सखोल चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे पत्रकारांना सांगितले.

पतलुक्का पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय पासवान यांचा मुलगा विकास कुमार याच्यावर बलात्‍काराचा, तर त्‍याच्‍या मित्रांवर बलात्काराचा व्हिडिओ बनविल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पीडितेचे कुटुंब पोलीस ठाण्यात आल्यानंतर पासवान यांनी पीडित मुलीलाच धमकावले होते. हे कुणाला सांगू नकोस अन्यथा महागात पडेल, अशी धमकी मुलीला दिली होती. त्‍यानंतर मुलीने आत्‍महत्‍येचा निर्णय घेतला होता. पीडितेच्या मावशीने सांगितले, की जर आम्‍हाला न्याय मिळाला नाही तर बिहारच्या डीजीपींकडे तक्रार करू. विकास कुमारने मुलीवर बलात्‍कार करताना त्‍याचे मित्र बिक्कू सिंह, श्रवण आणि अन्य एकाने व्हिडिओ बनवला होता. घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली तर तुझ्या बहिणीवरही बलात्कार करू, अशी धमकी आरोपीने दिली होती. टेकडीवर जाऊन पीडित मुलगी नसा कापून घेत स्वतःला डोंगरावरून ढकलून देणार होती. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचली.