योगी आदित्यनाथ आक्रमक! म्हणाले, हिंदूंची घरे जाळल्यावर मुस्लिमांची घरे सुरक्षित कशी राहतील?

 
file photo
लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे तिथे पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्य कडवट हिंदुत्ववादी चेहऱ्याला समोर करून भाजप उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहे. नुकतेच योगींचे एक विधान समोर आले असून, त्यांच्या वक्त्यव्याने खळबळ उडाली आहे. जेव्हा दंगल होते तेव्हा प्रत्येक धर्म, पंथाच्या लोकांना त्याचा फटका  बसतो. हिंदूंची घरे जाळल्यावर मुस्लिमांची घरे कशी सुरक्षित राहतील, असे वादग्रस्त विधान योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
आमच्या ५ वर्षांच्या काळात आम्ही एकही दंगल घडू दिली नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. १९९० च्या काँग्रेसविरोधी  लाटेत अनेक पक्षांना सत्ता मिळाली. मात्र समाजवादी पार्टीने सत्तेचा उपयोग रामभक्तांवर गोळ्या झाडण्यासाठी केला. जेव्हा जेव्हा समाजवादी पार्टीला संधी मिळाली तेव्हा कुणीच सुरक्षित राहिले नाही. त्यांच्या काळात दंगलीच्या आगीत उत्तरप्रदेश जळत होता. मात्र आम्ही उत्तरप्रदेशला दंगलमुक्त केले, असे आम्ही ठामपणे सांगू शकतो, असे योगी म्हणाले. सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भाजपचा अजेंडा आहे. भारत आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटावा यासाठी अयोध्येनंतर आता मथुरा अभियान राबविण्यात येत आहे. अयोध्या - काशीनंतर मथूरेचाही विकास होईल, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.