अरेच्‍चा... व्हायग्रा गोळ्याचा हा लाभ वाचून तुम्हीच व्हाल थक्‍क!

 
file photo
लंडन ः लैंगिक उत्तेजनासाठी घेण्यात येणाऱ्या व्हायग्राच्या गोळ्यांमुळे कोरोनामुळे कोमात गेलेल्या महिलेला जीवनदान मिळाल्याची बाब समोर आली आहे.  ब्रिटनच्या गेन्सबोरो शहरात ही घटना घडली आहे. एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही महिला कोरोनामुळे अगदी शेवटच्या घटका मोजत होती. मात्र व्हायग्रा उपचारानंतर तिला जीवनदान मिळालंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेन्सबोरो येथील ३७ वर्षीय मोनिका अल्मोडा हिला ९ नोव्हेंबर रोजी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. कोरोनामुळे ती तब्बल २८ दिवस कोमात होती. उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने तिची वाचण्याची शक्यता कमीच असल्याचे डॉक्टर सांगत होते.

आयसीयूमध्ये तिला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. सर्व आशा संपल्या होत्या. पुढच्या ७२ तासांनंतर व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय सुद्धा डॉक्टरांनी घेतला होता. मात्र प्रयोग म्हणून व शेवटचा उपचार म्हणून डॉक्टरांनी तिला व्हायग्राच्या गोळ्या दिल्या आणि तिच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा झाल्याचे दिसून आले.

कोमात जाण्यापूर्वी मोनिकाने या उपचाराला होकार दिला होता. व्हायग्रा सेवनानंतर मोनिका कोमातून बाहेर आली. व्हायग्रामुळे शरीरातील सर्व भागात रक्तप्रवाह सक्षम झाला तसेच ऑक्सिजन पातळीत सुद्धा वाढ झाल्याचे डॉक्टरांना दिसले. आता मोनिकाला रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.