आपल्या समाजात मुलींची कमी होती का... तेजस्वींचे 'मामा' संतापले!

 

पाटणा : लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी त्यांची मैत्रीण रचेलसोबत लग्न केले. तेजस्वी यांच्या लग्नामुळे यादव कुटुंबात आनंदाचे वातावरण असले तरी रचेल ख्रिश्चन असल्याने तेजस्वी यांचे मामा मात्र खफा आहेत. ते प्रचंड संतापले असून, तेजस्वी हा यादवांना कलंक आहे. तो बिहारमध्ये आल्यास बूट आणि चपलेने त्याचे स्वागत करू, असा संताप साधू यादव यांनी व्यक्‍त केला आहे.

तेजस्वी यादव यांनी ख्रिश्चन मुलीशी लग्न का केले?, असा सवालही साधू यादव यांनी उपस्थित केला. तेजस्वीने स्वतःच्या धर्मात लग्न का केले नाही? जातीतल्या मुलीशी लग्न का केले नाही? यादव समाजामध्ये संताप आहे, असा दावाही साधू यादव यांनी केला आहे. लालूप्रसाद यादवांनी आपल्या मुलींच्या लग्नात जात-धर्म सर्व काही पाहून लग्न केलं. मात्र तेजस्वीच्या लग्नात एवढी मोठी चूक झालीच कशी, असा सवालही साधू यादव यांनी केला आहे.

यादव समाज लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाला आपला नेता मानत होता. मात्र तेजस्वी यादव यांनी आता मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नांवर पाणी सोडून द्यावे, असेही साधू यादव म्हणाले. कारण तेजस्वी आता यादव नव्हे तर ख्रिश्चन झाला आहे. लालूयादव वर्षानुवर्षे सत्तेत राहिले. मात्र आता हा यादव समाज तेजस्वी यादव यांना विरोध करणार आहे, असेही तेजस्वीचे साधू यादव म्हणाले. यादव समाजात मुलींची कमतरता होती का, बिहारच्या जनतेला तुम्ही मते मागता पण लग्नासाठी दुसऱ्या राज्यातील, दुसऱ्या धर्मातील मुली निवडता...? बिहारचे लोक लालूंनाच आता याचे उत्तर देतील, असेही साधू यादव म्हणाले.