इशारा ः कमजोर हृदयाच्या लाेकांनी ही बातमी वाचूच नये!

 

भूत खरंच असतं का हो... काही लोक म्‍हणतील नाही. काही म्हणतील हो... भुताच्या साऱ्या कहाण्या या काल्पनिकच असतात किंवा योगायोगाने घडलेल्या काही घटना असतात. ज्‍या भुतानेच घडवून आणल्यात, असा समज होतो आणि भुताबद्दलची भीती वाढत राहते. भूत नक्की काय असतं, त्‍याचे प्रकार काय असतात, हे जाणून घेण्यात भीती वाटत असेल तर दुसरी एखादी बातमी वाचायला घ्या... नसेल भीती वाटत तर पुढे वाचा...

  • चकवा : चकवा लागल्याचे अनुभव अनेकांना आलेले असतात. अनेक जण याबद्दल अगदीच सविस्तर कहानी सांगतात. त्यात खरेखोटे किती तेच जाणोत. अर्थात चकवा काही भूताचा प्रकार नाही. पण भुतांकडून भूल देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, असे म्‍हणतात. उदाहरणादाखल थोड्याच अंतरावर तुम्हाला जायचे असते. पण चकवा लागला की तुम्हाला रस्ता संपता संपेना होतो. वाट शोधणे कठीण होते. चकवा शक्यतो रात्री लागतो. कधी कधी भरदुपारीही लागतो. कधी कधी प्राण्यांच्या रुपातही चकवा लागतो म्‍हणे... खरे खोटे त्‍या चकवा लागलेल्या लोकांना आणि त्या चकव्यालाच माहीत. अनेक जण चकवा लागल्याच्या कथा रंगवून सांगतात. हे अनुभव इतके भयानक असतात, की अंगावर काटा येतो. त्यामुळे असे अनुभव न ऐकलेलेच बरे.
  • मानकाप्या ः काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कुठल्या तरी उपटसुंभ तरुणांच्या टोळक्याने मानकाप्या भुताचा हा फेक व्हिडिओ रात्री तयार केला होता आणि तो इतका व्हायरल झाला की बुलडाणा लाइव्हपर्यंत येऊन पोहोचला होता आणि त्‍याची शहनिशा करण्याची विनंती आम्हाला करण्यात आली. त्‍यानंतर तो व्हिडिओ फेक असल्याचे त्या त्या वाचकांना आम्ही कळवले होते. मानकाप्या भुताला मुंडके नसते म्‍हणून त्‍याला मानकाप्या म्‍हणतात. त्‍याला नुसते धड असते. हे भूत म्हणे कधी घोड्यावर तर कधी चालताना दिसते. मुंबईच्‍या अनेक भागांत आजही अशा प्रकारचे मानकाप्या भुत दिसते असे म्हटले जाते. अर्थात मुंबईत लुटमार करण्यासाठी काही भुरटे चोर मानकापे भुत बनून फिरत असतील. त्‍यामुळे त्‍यातही सत्यता किती हा प्रश्न उरतोच. हे मानकाप्या भुत नक्की आपल्याला काय करतं हा प्रश्न उरतोच. तसं ते काही करत नाही, फक्‍त घाबरवतं. पण त्याच्या मार्गात आलो तर ते जीवंत सोडत नाही असं म्‍हणतात.
  • देवचार  ः देवचार हे तसे कोकणातलं भुत आहे. म्‍हणजे तिकडेच भुताचा प्रकार आजवर दिसून (!) आला आहे.  देवचार या शब्दाचा अर्थ होतो गावाचा राखणदार. हे भुत वेगवेगळ्या रूपात दिसते. अनेकांना हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी अशा रुपात देवचार दिसला आहे. या भुताचा ठराविक मार्ग असतो. त्‍यावरून ते फिरतं. त्‍याच्‍या मार्गात गेल्यावर दोनवेळा ते सोडून देतं. (म्‍हणजे समजुतदार भुत म्‍हणायचं  नाही का!) पण वारंवार तुम्ही त्याच्या मार्गात गेले की ते त्रास देतं. त्‍याचे काम म्‍हणजे गावाची रक्षा करणे आहे. असलं साधंभोळं भुत खरंतर आपल्या बुलडाणा जिल्ह्यात शेताच्या रक्षणासाठी ठेवलं पाहिजेत. जेणेकरून सुड्या जाळणाऱ्यांना ते सोडणारच नाही. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी कुणी दिसलं की हे भुत घाबरवून सोडतं म्‍हणजे. आपल्या गावात रात्री उशिरापर्यंत पारा गप्पा हाणणाऱ्यांना हे भुत चांगलंच वठणीवर आणू शकतं बरं. सुरुवातीला देवचार म्‍हणे सामान्य उंचीचाच असतो. पण अचानक उंच उंच व्हायला लागतो. या भुतामुळे आजवर तरी कुणाचा मृत्यू झाल्याचे ऐकिवात नाही.
  • मुंजा : मुंजा हे भुतंही तसं चांगलंच म्‍हणायला हवं. कारण ते आजवर कुणाला मृत्‍यूपंथाला घेऊन गेलेलं नाहीये. एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच वारला तर तो मुंजा होतो, असे म्हणतात. त्‍याचे रहिवास ठिकाण म्‍हणजे पिंपळाचे झाड. ते तिथंच राहतं. (खातपितही तिथेच असेल का असले प्रश्न विचारू नका बरं!) मुंजाने आजवर कुणाला मोठी बाधा पोहोचवून जीव जायला कारणीभूत ठरलेला नाही. पण ते घाबरवतं असे म्‍हणतात. हा भूताचा सर्वांत समजुतदार प्रकार म्‍हणावा.
  • खवीस : खवीस हे भूत तसं मुस्लिम बांधवात प्रचलित आहे. ते अत्यंत भयंकर आहे. छळून छळून मारणारे हे भूत आहे. एखाद्याचा मृत्‍यू अत्‍यंत क्रूरपणे होतो तेव्हा तो खवीस बनतो. अशा प्रकारची भुतं एकदा मागे लागली की मारल्याशिवाय सोडत नाहीत. अनेक ठिकाणी हे भुत दिसलं आहे, असंही काही लोक मानतात.