घरातल्यांना बेशुद्ध करून नवरी पळाली भुर्रर्र...

 
नवी दिल्ली : लग्नाची वरात येण्याच्या काही तास अगोदर एका नवरीने कुटुंबियांना चकमा देऊन पलायन केले. नवरीने घरातील लोकांना नशेचा पदार्थ टाकलेला चहा देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातील दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे हे विचित्र प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजाबादच्या कौशल्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. तरुणीच्या संमतीशिवाय तिचे लग्न केले जात होते. या लग्नासाठी ती खुश नव्हती. तिचे एका दुसऱ्या तरुणासोबत  प्रेमसंबंध होते. शुक्रवारी रात्री घरात महिलांचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर सर्व शेजारी निघून गेल्यानंतर नवरीने घरातील सदस्यांना चहा दिला. चहा पिताच घरातील सगळे बेशुद्ध झाले. ज्यावेळेस त्यांना शुद्ध आली त्यावेळेस ते रुग्णालयात होते. नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या नवरीचा शोध सुरू केला. दरम्यान वधू पळून गेल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती न सापडल्याने  ऐनवेळी तिच्या लहान बहिणीसोबतच आलेल्या नवरदेवाचे लग्न लावण्यात आले.