खासदाराची मुक्‍ताफळे, मोदींच्या दाढीत घरेच घरे!!

मोदी एकदा दाढी झटकतात तर ५० लाख घरे पडतात, दुसऱ्यांदा झटकतात तर १ कोटी घरे...!
 
file photo

भोपाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीत घरच घरे आहेत. त्‍यांनी दाढी झटकली तरी ५० लाख घरे त्‍यातून पडतील. घरकुल योजनेतील घरे त्‍यांच्‍या दाढीतून पडतात. जोपर्यंत देशातील प्रत्‍येकाला घरकुल मिळत नाही तोपर्यंत त्‍यांच्‍या दाढीतून घरेच घरे पडतील, पडत राहतील... अशी मजेशीर मुक्‍ताफळे कुण्या काँग्रेसच्या नेत्‍याने उपहासाने उधळलेली नाहीत, तर भाजपाच्याच खासदाराने अतिउत्‍साहात कौतुकोद्‌गाराचा पाऊस पाडला आहे. मध्य प्रदेशमधील रीवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांची ही विधाने सध्या सर्वांसाठी गंमतीचा विषय ठरली आहेत.

सोशल मीडियावरही त्‍यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. स्थानिक बोली भाषेत मिश्रा म्‍हणाले, की दाढी राहील तोपर्यंत कुणीही विना घरकुलाचं राहणार नाही. मोदी एकदा दाढी झटकतात तर ५० लाख घरे त्यातून पडतात. दुसऱ्यांदा दाढी हलवतात तर १ कोटी घरं त्यातून निघतात. आमदार म्हणतील तोपर्यंत दाढीतून घरे पडतच राहतील, असे ते म्‍हणाले. मोदींची दाढी तुम्ही पाहा. पाहणं बंद कराल तर घरकुल मिळणेदेखील बंद होईल, असेही ते म्‍हणाले. मिश्रांच्या या विधानानंतर उपस्‍थितांत हशा पिकला. यावेळी स्‍थानिक आमदार के.पी. त्रिपाठी हेही हजर होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खा. मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिलं असून, घरकुल योजना बंद होण्याची भीती लोकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी असं बोलल्याचे ते म्‍हणाले.