काही दिवस एकत्र राहिल्याने "लिव्ह इन रिलेशनशीप' होत नाही!; हायकोर्टाने युगुलाला फटकारले!!
चंदीगड : भारतात "लिव्ह इन रिलेशनशीप'ला संबंधाला मान्यता असली तरी समाजातील अनेक घटकांचा आजही अशा संबंधांना विरोध आहे. केवळ काही दिवसांसाठी तुम्ही एकत्र राहिले म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहात असे होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण चंदीगड उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
एका प्रेमीयुगुलाने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे. एका प्रेमीयुगुलाने तरुणीच्या कुटूंबियांपासून संरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका तर फेटाळून लावलीच. शिवाय कोर्टाचा वेळ वाया घालविल्याबद्दल याचिकाकर्त्यांना १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचिका करणारा तरुण २० तर तरुणी १८ वर्षांची आहे.
तरुणीच्या पालकांचा या संबंधांना विरोध होता. त्यामुळे घरातून पलायन करून ती तरुणासोबत राहत होती. याबाबत निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने म्हटले की, एकमेकांप्रती काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे पालन केल्याने लिव्ह इन नाते वैवाहिक संबंधासारखे बनते. केवळ काही दिवस एकत्र राहिले म्हणजे दोन प्रौढ व्यक्ती लिव्ह इनमध्ये आहेत असे होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.