मॉर्निंग वॉक करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार! १०१० रुपयांच्या पेट्रोलने आरोपींना पाठवले जेलात...

 
रांची : मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून धावत्या कारमध्ये तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रांची शहरात समोर आली आहे. १६ जानेवारीच्या सकाळी हा प्रकार घडला. बलात्कार करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अवघ्या १२ तासांत यश आले आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, धावत्या कारमध्ये तिघांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. संधी साधून ती कशी बशी त्या नराधमांच्या तावडीतून सुटली. तिने थेट पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. अपहरण केल्यानंतर काही अंतरावर त्यांच्या गाडीतले पेट्रोल संपले होते. तेव्हा एका पेट्रोलपंपावर त्यांनी १०१० रुपयांचे पेट्रोल टाकले, अशी माहिती तिने पोलिसांना दिली.

पोलिसांनी लगेच रांची शहरातील रिंग रोडवरील सर्व  पेट्रोलपंपांची तपासणी केली. १०१० रुपयांचे पेट्रोल टाकणारी एक कार एका पेट्रोलपंपावरील सीसीटिव्ही फूटेजमध्ये कैद झाली. गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी गाडीमालकाची चौकशी केली. त्याने कदूस अन्सारी (२३) हा गाडी चालवत असून गाडी त्याच्याकडेच असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कदूस अन्सारी याच्या घरावर छापा मारला. पोलिसांनी १२ तासांच्या आत कदुस अन्सारी, सोहन कुमार (२१) आणि इरसाद अन्सारी(२०) तिघांना बेड्या ठोकल्या.