काय कळेना कोण चालू...पण तरुणीच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध बलात्‍काराचा गुन्हा दाखल!

 
जयपूर : नोकरीचे व लग्नाचे आमिष  दाखवून तरुणाने तरुणीला पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला. राजस्थानच्या जयपुरात ही घटना समोर आली आहे. तरुणाने तिचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने केला आहे. आरोपी आणि पीडित तरुणी दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणात तरुणाने सुद्धा त्याची बाजू मांडली आहे. आम्ही दोघे प्रेमात होतो. मात्र दोन महिन्यांपूर्वी तिला एका दुसऱ्या तरुणासोबत फिरताना पाहिले. त्‍यामुळे तिला सोडल्याने तिने बलात्काराची तक्रार केल्याचे त्‍याने म्‍हटले आहे. अमित शर्मा असं या तरुणाचे नाव असून तो हरियाणा राज्यातील रहिवाशी आहे.

उदयपूर येथील पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये बी.टेक. करण्यासाठी ती जयपूरला आली होती. दरम्यान अमित शर्माशी तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांनंतर अमितने तिला खातीपुरा येथील एका मित्राच्या घरी नेले. कॉफीत नशेचा पदार्थ टाकून तिच्यावर बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यावर तिला लग्नाचे आमिष दाखवले.

त्यानंतर २०१७ पर्यंत तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. तिला नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात नेऊनही तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघे कॉलेजची डिग्री घेण्यासाठी पुन्हा जयपूरला आले. तिथे एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अमितने रूम बुक केली. त्या रात्रीसुद्धा अमितने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याच रात्री अमितला दिल्ली येथील एका तरुणीचा फोन आला. ती स्वतःला अमितची प्रेयसी असल्याचे सांगत होती. त्यानंतर तरुणीने जेव्हा अमितला याबद्दल जाब विचारला तेव्हा अमितने लग्नाला नकार दिला, असे तरुणीने जयपूरच्या जवाहर सर्कल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.