एटीएममधून पैसे काढण्यासाठी आजपासून अतिरिक्त चार्ज!

 
नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यासाठी १ जानेवारी २०२२ पासून बँकेच्या ग्राहकांना आधीच्या तुलनेत अधिकचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. महिन्यातील ५ व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र त्यानंतर होणाऱ्या व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार आहे. बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बँकेकडून वाढीव शुल्काच्या माहितीचे मेसेज प्राप्त होत आहेत. रिझर्व बँकेने याआधी जून महिन्यातच तशी घोषणा केली होती.
देशातील बँकांना ५ व्यवहारांनंतर होणाऱ्या व्यवहारांवर अधिकचे शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली होती. एटीएमद्वारे होणाऱ्या प्रति व्यवहारांवर २१ रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचा अधिकार बँकांना असणार आहे. ॲक्सिक्स बँकेने यासंदर्भात त्यांच्या ग्राहकांसाठी दिलेल्या संदेशात म्हटले की १ जानेवारी २०२२ पासून ५ व्यवहारानंतर होणाऱ्या प्रति व्यवहारांसाठी २१ रुपये +जीएसटी शुल्क एवढी रक्कम आकारण्यात येणार आहे.