पंतप्रधानांच्या सुरक्षेचा एका दिवसाचा खर्च माहीत आहे का..? जाणून घ्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबच्या ज्या रस्त्यावरून जाणार होता तिथे फ्लायओव्हरवर अचानक आंदोलन सुरू झाल्याने मोदींचा ताफा तब्बल २० मिनिटे रस्त्यावर अडकला होता. त्यावेळी सर्व कमांडो आणि पोलिसांनी मोदींच्या वाहनाला गराडा घालून सुरक्षा पुरविली होती. शेवटी पंतप्रधानांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्यांचा ताफा माघारी फिरला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारला याबाबत अहवाल मागितला आहे.
अति महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेत मोठा धोका निर्माण झाल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे. पंतप्रधान जेव्हा एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर असतात तेव्हा एसपीजी बरोबरच राज्य पोलिसांची सुद्धा पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. २ जून १९८८ मध्ये संसदेत एक कायदा तयार करण्यात आला. पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांची निवड आधी पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्समधून केली जात होती. त्यातूनच पुढे एसपीजीचा जन्म झाला. एसपीजी हे देशातील प्रमुख व्यक्तींना सुरक्षा देणारे महत्त्वाचे सुरक्षा दल आहे. पूर्वी पंतप्रधान तसेच इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाही एसपीजी सुरक्षा देण्यात येत होती. मात्र आता केवळ पंतप्रधानांनाच ही सुरक्षा आहे. २०१९ मध्ये एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला. कायद्यात बदल करण्याआधी पंतप्रधानांबरोबर ही सुरक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनासुद्धा पुरवली जात होती.
आधी चार व्यक्तींना पुरविली जाणारी ही सुरक्षा आता केवळ पंतप्रधानांनाच आहे. ही सुरक्षा केवळ एका व्यक्तीलाच असली तरी त्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत १० टक्क्यांनी वाढ केली आहे. पंतप्रधानांच्या चोहूबाजूंनी वेढा देऊन त्यांना सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना एसपीजीचे जवान सुरक्षा देत असतात. एसपीजी जवानांबरोबरच पंतप्रधानांच्या टप्प्यामध्ये एक डझन गाड्यासुद्धा असतात. यामध्ये बीएमडब्ल्यू सेवन सिरीज, ६ बीएमडब्ल्यू एक्स थ्री आणि एक मर्सिडीज बेंज असते. यासोबतच आपत्कालिन स्थितीत रुग्णवाहिका म्हणून वापरता येईल अशा पद्धतीने रचना केलेली मर्सिडीज बेंज आणि टाटा सफारी सारखी गाडी असते. त्याचबरोबर या ताफ्यातील गाड्या अनेकदा बदलल्या जातात. तरीही त्या आलिशान आणि सुरक्षित असतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा देशातील मुख्य चेहरा आहेत. अगदी राज्यातील निवडणुकांपासून तर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी ते देशभर दौरे करतात. मागील सात वर्षांत मोदींनी अनेक परदेश दौरेही केले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या दहा वर्षांतील दौऱ्यापेक्षा मोदींनी पाच वर्षांत अधिक परदेश दौरे केले आहेत. परदेश दौऱ्यांमध्येसुद्धा मोदींना एसपीजी कमांडोचे सुरक्षा कडे असते. २०१४ -१५ मध्ये जेव्हा मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा एसपीजीचे बजेट २८९ कोटी होते. २०१५ - १६ मध्ये हे बजेट ३३० कोटी रुपये करण्यात आले. २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये एसपीजीसाठीचे बजेट ५४० कोटी १६ लाख रुपये इतके करण्यात आले. म्हणजेच पंतप्रधान मोदींना सुरक्षा पुरवण्यासाठी रोज एसपीजीवर तब्बल १ कोटी १७ लाख रुपये खर्च केले जातात. दर मिनिटाला पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ११ हजार २६३ रुपये खर्च होतात.