बदला..! पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यापैकी एकाला बॉम्बने उडवले!!; दोघांना मारण्यापूर्वी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

 
file photo
रतलाम : तीन जणांनी मिळून एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पत्‍नीवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी महिलेच्या पतीने तिघांच्या हत्येचा कट रचला. तिघांपैकी एकाला डायनामाईट बॉम्बने उडवले. मात्र दोघांना मारण्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात ही थरारक घटना समोर आली आहे.
रतलाम जिल्ह्यातील एका गावात बॉम्ब पेरून शेतकऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना ४ जानेवारी रोजी समोर आली होती. हा मृत्यू एवढा भयंकर होता की शेतकऱ्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधाड्या उडाल्या होत्या. आधीच स्फोटके पेरून ते मोटरच्या स्टार्टरला जोडण्यात आले होते. त्यामुळे हे हत्येचेच प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, हत्येच्या दिवसापासून गावातील एक जोडपे गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जोडपे देवदर्शनाला गेल्याचे त्यांच्या कुटूंबियांकडून सांगण्यात आले. मात्र जोडप्याचा मोबाईल नंबरसुद्धा बंद येत असल्याचे पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि जोडप्याचा शोध घेत मध्यप्रदेशातील मंदसौर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान महिलेच्या पतीने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली केली. ३ जानेवारीच्या रात्री मृत शेतकरी लालसिंगच्या शेतात आरोपीने जिलेटीन आणि डीडोनेटर पुरले व त्याची वायरिंग विहिरीवरील मोटारचा स्टार्टरला जोडली. लालसिंग पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरु करायला गेला आणि त्याच्या चिंधड्या उडल्या. पोलिसांनी हत्येचे कारण विचारल्यावर आरोपीने सांगितले की, मृतक लालसिंग आणि त्याचे दोन साथीदार भंवरलाल आणि दिनेश यांनी वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून आरोपी सुरेश सूडाच्या आगीत जळत होता. बदला घेण्यासाठी त्याने तिघांच्या हत्येचा कट रचला. तिघांपैकी एकाला संपविण्यात यश आल्याचे आरोपी सुरेशने पोलिसांना सांगितले.