ब्लॅकमेल गर्ल!.. १५ महिन्यांत बलात्काराच्या ८ तक्रारी केल्या... २० वर्षीय तरुणी करायची आधी प्रेम, नंतर शरीरसंबंध अन् वसुली!!
Jan 1, 2022, 10:54 IST
गुरुग्राम : आधी प्रेमाचे नाटक करायचे, शरीरसंबंध ठेवायचे अन् मग याच शरीरसंबंधाच्या आधारे तरुणांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे... असा प्रताप अवघ्या २० वर्षीय तरुणीने गेल्या १५ महिन्यांत केला. बलात्काराच्या आठ तक्रारी तिने केल्या. पण अखेर तिचा भंडाफोड झाला. चित्रपटांना साजेशी अशी ही कथा हरियाणा राज्यातील गुरुग्राम जिल्ह्यात समोर आली आहे. गुरुग्राम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रतिपाल सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ब्लॅकमेलिंग आणि वसुलीसाठी तरुणीची आई आणि तिचे साथीदारही तिला मदत करीत होते. गुरुग्राम जिल्ह्यातील अनेक तरुणांशी डेटिंग अॅपद्वारे तिने जवळीक साधली होती. तरुणांच्या भेटीगाठी घेत ती प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याआधारे ती बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत पैसे उकळायची. पैसे न देणाऱ्यांच्या विरोधात बलात्काराच्या खोट्या तक्रारी तिने पोलीस ठाण्यात दिल्या होत्या.
एका पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, आधी प्रेम, नंतर शरीरसंबंध आणि नंतर जबरदस्ती त्याच्याशी लग्नही केले होते. मात्र त्यालाही ब्लॅकमेल करून ती पैसे वसूल करत होती. वसुलीच्या या धंद्यातून तिने आतापर्यंत लाखो रुपयांची वसुली केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या गुरुग्राम पोलीस या तरुणीची कसून चौकशी करीत आहेत.