देशात भाजपचाच जोर!; पंतप्रधान म्‍हणून मोदींनाच पसंती!!, आता लोकसभा निवडणुका घेतल्या तरी पूर्ण बहुमत...जाणून घ्या देशाचा मूड!

 
नवी दिल्ली : देशात सध्या उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. दरम्यान देशपातळीवर करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे समोर आले आहे. इंडिया टुडे आणि सी- वोटर मूड ऑफ द नेशन या नावाने केलेल्या सर्वेक्षणात आता लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपलाच पूर्ण बहुमत मिळेल, असे सर्वेक्षणात समोर आले आहे. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९६ जागा मिळतील, असे सर्वेत म्हटले आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीची कामगिरी यावेळी बऱ्यापैकी चांगली होईल. यूपीएला १२७ जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४० टक्के, काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीला २६.७ टक्के तर अन्य पक्षांना ३२ टक्के मते मिळतील, असेही सर्वेक्षणात समोर आले आहे.

पंतप्रधान मोदींना पसंती...
देशात पंतप्रधान म्हणून लोकांना मोदींचाच चेहरा आवडत असल्याचे सर्वेत समोर आले आहे. ३५ टक्के लोक मोदींच्या कामाला अतिउत्कृष्ट, २८ टक्के लोक उत्कृष्ट मानतात. केवळ १२ टक्के लोक मोदींचे काम खराब असल्याचे तर १५ टक्के लोक मोदींचे कामकाज बऱ्यापैकी असल्याचे म्हणतात.

महागाई मोदी सरकारचे अपयश...
देशातील २५ टक्के लोकांनी वाढती महागाई हे मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे म्हटले आहे. १४ टक्के लोकांनी बेरोजगारी तर १० टक्के लोकांनी शेतकरी आंदोलन हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.

लोक म्हणतात मोदीनंतर अमित शहा...
सर्वेक्षणात लोकांना मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. २४ टक्के लोकांनी अमित शहा तर २३ टक्के लोकांना योगी आदित्यनाथ मोदींचे उत्तराधिकारी राहतील, असे वाटते. ११ टक्के लोकांना नितीन गडकरी हे मोदींचे उत्तराधिकारी राहतील, असे वाटते.