संतापजनक... चोरीच्या संशयावरून दुकानदाराने महिलेचे उतरवले कपडे!

 
जयपूर : चोरीचा संशय आल्याने एका कापड व्यावसायिकाने दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या अंगावरील कपडे उतरवून तपासणी केली. ही संतापजनक घटना राजस्थानमधील जयपूर शहरात समोर आली आहे. या प्रकरणात अपमानित झाल्यामुळे महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शोरूमच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

जयपुरातील एका कापड दुकानात महिला कपडे खरेदी करण्यासाठी आली होती. तिने दुकानातून कपड्यांचे ११ नग खरेदी केले होते. हे सर्व कपडे तिने चेजिंग रूममध्ये घालून बघितले होते. मात्र जेव्हा दुकानाच्या काउंटरवर दुकानदाराने कपडे दिले. त्यात केवळ १० कपडे व ११ कपड्यांचे बिल होते. एक कपडा तुमच्याकडेच आहे, असा दुकानदाराचा आरोप होता. मात्र माझ्याकडे कपडा नाही, असे वारंवार सांगूनही महिलेवर दुकानदाराने विश्वास ठेवला नाही.

दुकानदाराने गार्डला बोलावून महिलेला पुन्हा चेंजिग रूममध्ये नेले व अंगावरील कपडे उतरवून आत कपडा लपवलाय का याची तपासणी केली. मात्र तरी दुकानदाराला कपडा मिळून आला नाही. मात्र या प्रकारामुळे अपमानास्पद वागणूक मिळाल्याने व लज्जित झाल्याने महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शोरूम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.