चोरी केल्यानंतर चोर दुकानदाराला म्‍हणाला, सॉरी!; सामानही केले परत!!

 
file photo
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बांदा येथे चोरीचे अजब प्रकरण समोर आले आहे. चोरट्यांनी आधी दुकानातून चोरी केली. मात्र नंतर एक इमोशनल पत्र लिहून दुकानदाराला चोरलेले सामान परत दिले. पत्रात चोरट्यांनी दुकानदाराची माफी मागितली आहे. या प्रकारानंतर पोलीसही चक्रावले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिसांडा पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रयाल या गावात राहणारा दिनेश तिवारी अतिशय गरीब आहे. काही महिन्यांपूर्वी ४० हजारांचे कर्ज घेऊन त्याने गावात वेल्डिंगचे दुकान सुरू केले. २० डिसेंबर रोजी त्याच्या दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले. दुकानातील अवजारे, वेल्डींग मशीन चोरट्यांनी चोरले होते. त्यानंतर दिनेशने पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची तक्रार दिली.

मात्र २२ डिसेंबर रोजी दिनेशच्या घरापासून काही अंतरावर त्याला सामान सापडले. त्यामुळे त्याला अत्यानंद झाला. चोरट्यांनी परत केलेल्या सामानावर एक चिठ्ठी लिहिली होती. हे सामान दिनेश तिवारीचे आहे. जेव्हा आम्हाला तुमच्याबद्दल कळले तेव्हा आम्हा खूप वाईट वाटले. त्यामुळे आम्ही सामान परत करत आहोत... असे त्या चिठ्ठीवर लिहिले होते. दिनेशच्या आर्थिक परिस्थितीची माहिती झाल्यानंतर चोरट्यांनी दिनेशचे सामान परत केले. सामान परत मिळाल्याने दिनेशने देवाचे आभार मानले.