घरात पंतप्रधान मोदींचा फोटो लावणाऱ्या युसूफला घरमालकाने ठेवली अट; म्हणे फोटो काढ नाहीतर घर खाली कर!

 
इंदौर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या युसूफने पंतप्रधानांचा फोटो लावला. मात्र घरमालक घरातून फोटो काढण्यासाठी दबाव टाकत असल्याची  तक्रार त्याने पोलिसांकडे  केली आहे. मोदींचा फोटो काढून टाकला नाही तर घरमालक घर खाली करण्याची धमकी देत ​​असल्याचे त्याने तक्रारीत  म्हटले आहे. 
याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

इंदौरच्या रिगल तिराहे येथील पोलीस आयुक्त कार्यालयात दर मंगळवारी होणाऱ्या जनसुनावणीत हे अनोखे प्रकरण समोर आले. इंदौर येथील पीर गली भागात  राहणारा युसूफ जनसुनावणीला पोहोचला होता.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता असल्याचे त्याने  अधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधानांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन आपण घरात त्यांचा फोटो घरात लावला असल्याचे तो म्हणाला. मात्र घराचे मालक शरीफ मन्सूरी, याकूब मन्सूरी आणि सुलतान मन्सूरी त्याचा छळ करत आहेत. युसूफची तक्रार ऐकून अधिकारीही चकित झाले.  पोलीस आयुक्तांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.